NEET EXAM : ‘फसवणूक करणारा डॉक्टर झाला तर…’ सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी

NEET UG Exam 2024  च्या पेपर लीक प्रकरणात सुप्रीम कोर्टाने मंगळवारी  18 जून रोजी  महत्त्वपूर्ण टिप्पणी केली की, सिस्टममध्ये छेडछाड करणारा कोणी डॉक्टर झाला तर ते चुकीचे असेल. यंदा झालेल्या NEET परीक्षेत हेराफेरीचा आरोप करण्यात आला असून, त्यामुळे देशभरात विद्यार्थी आणि पालकांकडून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. तपासाच्या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आल्या आहेत. आज या प्रकरणी सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने कडकपणा दाखवत 0.001 टक्केही हेराफेरी आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल, असे सांगितले.

न्यायमूर्ती विक्रमनाथ आणि न्यायमूर्ती एसव्हीएन भाटी यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. विद्यार्थ्यांची मेहनत आम्ही विसरू शकत नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. मुले यासाठी तयारी करतात आणि आपण त्यांच्या मेहनतीकडे दुर्लक्ष करू शकत नाही.

व्यवस्थेत हेराफेरी करणारी व्यक्ती डॉक्टर झाली तर समाजासाठी किती घातक ठरू शकते, असे न्यायालयाने पुढे म्हटले आहे. खंडपीठाने एनटीएला सांगितले की, ‘कल्पना करा की व्यवस्थेची फसवणूक करणारी व्यक्ती डॉक्टर बनते, हे समाजासाठी अधिक हानिकारक असेल.’ आता कोर्टात या प्रकरणी 8 जुलै रोजी सुनावणी होणार आहे. तोपर्यंत नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) आणि केंद्रालाही या संपूर्ण प्रकरणावर उत्तर द्यावे लागेल.

1,563 विद्यार्थी पुन्हा NEET परीक्षेला बसतील

न्यायमूर्ती विक्रमनाथ यांनी एनटीएला सांगितले की, न्यायालयाला अपेक्षित आहे की एजन्सीने यावर वेळीच कारवाई करावी. खंडपीठाने एनटीएच्या वकिलांना सांगितले की, “परीक्षा आयोजित करण्यासाठी जबाबदार एजन्सीचे प्रतिनिधित्व करताना, तुम्ही ठाम राहिले पाहिजे. जर काही चूक झाली असेल तर होय चूक झाली आहे आणि आम्ही ही कारवाई करणार आहोत. किमान यामुळे तुमच्या कामात आत्मविश्वास निर्माण होईल.

काही याचिकाकर्त्यांतर्फे उपस्थित असलेल्या वकिलाने परीक्षेत विचारलेल्या प्रश्नाशी संबंधित मुद्दा उपस्थित केला असता खंडपीठाने सांगितले की, ‘ते (एनटीए आणि केंद्र) यावर उत्तर देतील.’ कोर्ट म्हणाले, ‘आधी तुमच्या युक्तिवादाचा उद्देश समजून घेऊ. या प्रकरणी संध्याकाळपर्यंत बसण्याची आमची तयारी आहे.

यापूर्वी, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले होते की, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 1,563 विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुन्हा घेतल्या जात आहेत. दोन ठिकाणांहून फसवणुकीची प्रकरणे उघडकीस आल्याचे त्यांनी सांगितले. ग्रेस गुण मिळालेल्या १,५६३ विद्यार्थ्यांची फेरतपासणी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. एनटीएने या विद्यार्थ्यांना पेपर उशिरा मिळाल्याने आणि वेळ वाया गेल्यामुळे या विद्यार्थ्यांना ७१८ ते ७१९ पर्यंत ग्रेस गुण दिले होते आणि आता त्यांचे स्कोअरकार्ड रद्द करण्यात आले आहे.

20 वैद्यकीय इच्छुकांनी NEET परीक्षेत हेराफेरीचा आरोप करणारी याचिका दाखल केली आहे. या प्रकरणाची सीबीआय किंवा कोणत्याही स्वतंत्र एजन्सीमार्फत चौकशी करण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे. याचिकेत म्हटले आहे की, यावर्षी ६७ मुले ७२० गुण मिळवून अव्वल आली आहेत. याचिकाकर्त्याने म्हटले आहे की, यावेळी ४०० टक्के मुलांना ६२०-७२० गुण मिळाले आहेत, हे विचित्र आहे.

NEET परीक्षेचा निकाल 4 जून रोजी आला

एनटीए ही देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक आहे. या परीक्षेद्वारे विद्यार्थ्यांना देशभरातील सर्वोत्कृष्ट सरकारी आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळतो. विद्यार्थ्यांना NEET परीक्षेतील गुण आणि रँकच्या आधारे प्रवेश मिळतो. यावर्षी, NEET परीक्षा 5 मे रोजी 571 शहरांमधील 4,750 केंद्रांवर घेण्यात आली आणि 4 जून रोजी निकाल जाहीर झाला.