जळगाव : देशभरात ‘नीट’ परीक्षेच्या पेपर फुटीप्रकरणी अटक सत्र सुरू असताना जळगावात रविवार ३० जून रोजी सकाळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या विद्यार्थ्यांनी येथील ‘आयएमए” जळगाव तर्फे आयोजित रॅलीमध्ये सहभाग नोंदवून पेपर फुटीप्रकरणी निषेध व्यक्त केला.
‘नीट’ पेपर फुटीच्या निषेधार्थ जळगाव शहरात रविवारी ३० जून रोजी निषेध रॅली काढण्यात आली. निषेध रॅलीत विविध वैद्यकिय महाविद्यालयाचे विद्यार्थी, विद्यार्थिनी सहभागी झाले होते. यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे ४० विद्यार्थी, हे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठचे विद्यार्थी प्रतिनिधी तथा जनरल सेक्रेटरी राज सिंग छाबरा याच्या नेतृत्वाखाली सहभागी झाले होते.
यावेळी त्यांनी भ्रष्टाचारमुक्त आरोग्यदायी शिक्षण संदर्भात विविध घोषणा देऊन लक्ष वेधून घेतले. सहभागी विद्यार्थ्यांनी पेपर फुटी प्रकरणाचा निषेध केला. देशात चांगले व गुणवान डॉक्टर निर्माण करायचे असतील तर नीट परीक्षा ही पारदर्शकपणे घेतली गेली पाहिजे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेचे भले होणार आहे. या पेपर फुटी प्रकरणामुळे देशाची प्रतिमा खराब होते अशी प्रतिक्रिया यावेळी राज सिंग छाबरा यांनी दिली आहे.