सर्वोच्च न्यायालयात आज NEET-UG प्रकरणी होणारी सुनावणी पुढील तारखेपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. आता याप्रकरणी पुढील सुनावणी १८ जुलै रोजी होणार आहे. याआधी आज सीबीआयने आपला अहवाल बंद लिफाफ्यात न्यायालयात सादर केला आहे. अशा परिस्थितीत NEET-UG परीक्षा रद्द करून पुन्हा परीक्षा होणार का, याकडे सर्व विद्यार्थ्यांचे लक्ष सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे लागले आहे. यापूर्वी केंद्र सरकार, एनटीए आणि सीबीआयच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत कथित पेपर लीक प्रकरणाची फेरपरीक्षा आणि योग्य तपासाची मागणी केली आहे. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड, न्यायमूर्ती जेबी परडीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर वैद्यकीय प्रवेश परीक्षेतील अनियमिततेशी संबंधित याचिकांवर सुनावणी सुरू आहे. केंद्र आणि एनटीएने 5 मे रोजी झालेल्या परीक्षेत मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा इन्कार केला आहे. गुरुवारी सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले. याआधी बुधवारी केंद्र सरकार आणि एनटीए (नॅशनल टेस्टिंग एजन्सी) यांनी प्रतिज्ञापत्र दाखल केले होते. केंद्र सरकारने नीट परीक्षा पुन्हा घेण्याच्या बाजूने नसल्याचे न्यायालयाला आधीच सांगितले आहे.
गेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि एनटीएला प्रश्न विचारला होता की प्रश्नपत्रिका सुरक्षित कशी ठेवली गेली, ती परीक्षा केंद्रावर कशी पाठवली गेली आणि संभाव्य लीक कशी होऊ शकते? या संपूर्ण प्रक्रियेबाबत तुमची शपथपत्रे दाखल करा. तपासाची प्रगती आणि कथित पेपरफुटीच्या परिणामावर न्यायालय समाधानी नसेल तरच शेवटचा उपाय म्हणून फेरपरीक्षेचे आदेश दिले जातील, असेही न्यायालयाने म्हटले होते.