मराठी भाषेची उपेक्षा थांबलीच पाहिजे

तरुण भारत । प्रफुल्ल व्यास ।

जगात खूप भाषा आहेत. त्यात बोलीभाषाही आहेत. देशात हिंदी राष्ट्रभाषा आणि संस्कृत देवभाषा आहे. महाराष्ट्रात Marathi language मराठी मातृभाषा आहे. मात्र, मातृभाषा असलेल्या महाराष्ट्रात मराठीची आबाळ होत आहे. मराठी घरात बाळ जन्माला आलं आणि त्याच्या बोबड्या बोलण्याचा आनंद घेताना, त्याच्या कानावर आपले, आपल्या माय मराठीचे शब्द पडले तर किती छान होईल. पण, या मराठीच्या मातीत इंग्रजी हळूहळू रुजू लागली आहे. आता तर इंग्रजी येत नसेल तर तो चक्क अशिक्षित ठरतो. एवढेच नव्हे तर सामाजिकदृष्ट्याही मागास ठरविला जातो. महाविद्यालयीन युवक, युवती तर थेट हिंदीत बोलतात. पण, मराठीत बोलतानाही त्यांना मध्येच ‘बट’चा आधार घ्यावा लागतो. एवढं इंग्रजी नसानसात भिनलं आहे. या इंग्रजीच्या सपाट्यात मराठी शाळांवरील कवेलू उडून गेले. जगात नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने जायचे असेल तर इंग्रजी भाषा येणे आवश्यक आहे. त्यामुळे येणार्‍या पिढीला इंग्रजीचे ज्ञान असलेच पाहिजे, यात शंका नाही. परंतु, बोबडे बोल बोलता-बोलता लहान मुलाला घरात चिमणीऐवजी स्पॅरो, पालीऐवजी लिझार्ड आणि हद्द म्हणजे जिला आपण माता म्हणतो, त्या गाईला काऊ म्हणायचे शिकवतो. शाळेतून आधी चिमणी, कावळा, गाय, म्हैस, बदक शिकवले गेले पाहिजे. कारण, जगात इंग्रजीचीच चलती राहणार आहे.

इंग्रजांचे कबुतर जवळपास आज प्रत्येकाच्या डोक्यावरून उडून गेले असल्याने इंग्रजाळलेच वातावरण दिसते. त्यामुळे काऊ, स्पॅरो वगैरे शिकवणारे जगात भेटतील. गाय, चिमणी, मात्र आपल्यालाच शिकवावी लागेल आणि जिवंतही ठेवावी लागेल. कारण, Marathi language मराठीला टाकाऊ समजणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. अखिल भारतीय साहित्य संमेलनातून मराठीचा जागर व्हावा अशी अपेक्षा असते. परंतु, तिथे अध्यक्ष निवडण्यापासून ते सूप वाजेपर्यंत सारे वादग्रस्तच राहिले. यंदा वर्धेत होणार्‍या साहित्य संमेलनात अद्याप वादाचा विषय आलेला नाही आणि येऊही नये. परंतु, त्यापूर्वी मुंबईत बुधवारी झालेल्या विश्व साहित्य संमेलनात मराठीला ऊर्जा मिळाली. मराठी भाषा ‘अमृत’ असून, वैश्विक भाषा होईल हा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. त्यांनी दिलेली उदाहरणं वासरात लंगडी गाय शहाणी असणार्‍यांच्या डोळ्यात अंजन घालणारी आहेत. जर्मनीत अभ्यासासाठी गेले असता तिथे आलेले अन्य देशांतील अभ्यासार्थी त्या-त्या देशाच्या भाषेत अभ्यास करीत होते. दुर्दैवाने अद्याप राष्ट्रभाषा असलेली हिंदी आणि मातृभाषा असलेल्या मराठीला तो मान मिळवून दिला गेलेला नाही. विश्व साहित्य संमेलनाच्या निमित्ताने मराठीला तो दर्जा मिळाल्यास तो दिवस ज्ञानदेवांच्या पसायदानाची पूर्णाहुती ठरेल. कारण, 700 वर्षांपूर्वी संत ज्ञानेश्वरांनी पसायदानातूनच या विश्वाच्या कल्याणाचे दान मागितले होते.

मुळात Marathi language मराठीतील गोडवाच वेगळा आहे. प्रत्येक शब्दाला एक अर्थ आणि तो अर्थ मराठीतील र्‍हस्व, दीर्घातही आहे. इतर भाषांमध्ये तर बर्‍याचदा ते समजून घ्यावे लागते. इंग्रजीत काका आणि मामा यांना अंकल अन् काकू, मामी आणि आत्याला आंटी म्हटले जाते. पण, मराठीत मामाची बायको मामी, काकाची बायको काकू असते. हिंदीत तर ‘कल’ आणि ‘कल’मध्ये वाक्यावरून समजून घ्यावे लागते. मराठीत काल आणि उद्या हे दोन वेगवेगळे शब्द आहेत. मराठी शब्दांची खाण आणि अलंकार आहे. अंतरावरपरत भाषा बदलते, असे म्हटले जाते. पण, ती भाषा नसून, बोली बदलत असते. मराठीत असलेला गोडवा इतर कोणत्याही भाषेत आढळत नाही. मराठी भाषेतून अनुभूती येते. दुर्दैवाने ती महाराष्ट्राबाहेर गेलेली नाही. जगातील अनेक देशांत मराठीबांधव पोहोचले आहेत. त्या ठिकाणी महाराष्ट्रीय मंडळांची निर्मितीही करण्यात आली. परंतु, राज्यात राहणारे मात्र इंग्रजी, हिंदीच्या आडून मराठी बोलतात. मातृभाषेतून शिक्षण हा विषय गेल्या अनेक दिवसांपासून चर्चिला जातो आहे. राज्यात आता अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षण मराठीतून देण्यात येणार असल्याचे विश्व मराठी साहित्य संमेलनात जाहीर करण्यात आले. शिक्षण कोणतेही असो, ते मातृभाषेतून दिल्यास आणखी प्रभावी ठरते. त्यामुळे या निर्णयाचेही स्वागतच व्हायला हवे. सोबत मराठीविषयी विद्यार्थ्यांमध्ये गोडी निर्माण होईल.Marathi language मराठीनंतर पुढे तर इंग्रजीतच शिकावे लागते, असे होणार नाही. मराठी सुंदर आणि लवचीक भाषा आहे. तिचा उच्च शिक्षणात समावेश म्हणजे सन्मानच म्हणावा लागेल. त्यामुळे अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षण मराठीतून म्हणजे वैश्विक पाऊलच म्हणावे लागेल.