भुसावळ : नेपाळ दर्शनासाठी निघालेल्या वरणगावसह-तळवेल परिसरातील भाविकांची बस युपीच्या नेपाळमध्ये नदीत कोसळली. या अपघातात १४ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर पाच गंभीर आहेत. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. स्थानिक पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्याला वेग देण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ तालुक्यातील वरणगावसह तळवेल परिसरातील ११० भाविक नेपाळ दर्शनासाठी १५ ऑगस्ट रोजी रवाना झाले होते. भाविक प्रयागराजपर्यंत ट्रेनने गेल्यानंतर तेथून त्यांनी गोरखपूरच्या केसरवाणी टूर अॅण्ड ट्रॅव्हल्स एजन्सीच्या बस बुक केल्या होत्या. दरम्यान, बस क्र. यूपी.५३.एफटी.७६२३ ही भाविकांना घेवून पोखराकडून काठमांडा जाताना नियंत्रण सुटल्याने नदीत कोसळली.
या अपघातात बसचा चालक आणि वाहक यांच्यासह १४ भाविकांचा मृत्यू झाला आहे. जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी वृत्ताला दुजोरा दिला आहे.
यूपी आणि नेपाळ प्रशासनाशी संपर्क साधला असून १३ प्रवाशांना वाचविण्यात यश आल्याचे त्यांनी सांगितले. अद्याप पूर्ण माहिती प्राप्त झाली नसून काही वेळात संपूर्ण माहिती येणार असल्याचे त्यांनी सांगितले.