काठमांडू : केपी शर्मा ओली यांनी सोमवार, दि. १५ जुलै २०२४ चौथ्यांदा नेपाळच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. कम्युनिस्ट पक्षाचे नेते असलेल्या केपी ओली यांनी रविवारी राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी नेपाळच्या पंतप्रधानपदी नियुक्ती केली होती. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळच्या पंतप्रधानपदी नियुक्ती झाल्याबद्दल सीपीएन-यूएमएलचे अध्यक्ष केपी शर्मा ओली यांचे अभिनंदन केले आणि दोन्ही देशांमधील मैत्री आणखी दृढ करण्यासाठी त्यांच्यासोबत काम करण्यास उत्सुक असल्याचे सांगितले.
ओली यांचे अभिनंदन करताना मोदी म्हणाले, “आम्ही दोन्ही देशांमधील मैत्रीचे नाते अधिक दृढ करण्यासाठी आणि आमच्या लोकांच्या प्रगतीसाठी आणि समृद्धीसाठी आमचे परस्पर फायदेशीर सहकार्य वाढवण्यासाठी एकत्र काम करण्यास उत्सुक आहोत.” मोदींनी आपल्या पोस्टमध्ये पुढे लिहिले की, “नेपाळच्या पंतप्रधानपदी तुमची नियुक्ती झाल्याबद्दल केपी ओली तुमचे अभिनंदन. आपल्या दोन्ही देशांमधील मैत्रीचे सखोल नाते अधिक दृढ करण्यासाठी आणि प्रगती आणि समृद्धीसाठी आमचे परस्पर फायदेशीर सहकार्य आणखी विस्तारण्यासाठी सोबत मिळून काम करण्यास उत्सुक आहोत.”
७२ वर्षीय ओली हे पुष्प कमल दहल ‘प्रचंड’ यांची जागा घेतील. संसदेतील सर्वात मोठा पक्ष असलेल्या नेपाळी काँग्रेसच्या पाठिंब्याने ते पंतप्रधान झाले आहेत. राष्ट्रपती भवनाची मुख्य इमारत शीतल निवास येथे राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी ओली यांना शपथ दिली. संवैधानिक आदेशानुसार ओली यांना त्यांची नियुक्ती झाल्यानंतर ३० दिवसांच्या आत संसदेकडून विश्वासदर्शक ठराव मंजूर करावा लागणार आहे. २७५ जागांच्या प्रतिनिधीगृहात ओली यांना किमान १३८ मतांची गरज आहे.