---Advertisement---
Sanjay Malhotra : भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) 50 रुपयांच्या नोटेसंदर्भात महत्त्वाची माहिती जारी केली आहे. लवकरच आरबीआयचे नवनियुक्त गव्हर्नर संजय मल्होत्रा यांची स्वाक्षरी असलेली 50 रुपयांची नवी नोट चलनात येणार आहे.
माजी गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्या निवृत्तीनंतर डिसेंबर 2024 मध्ये संजय मल्होत्रा यांनी पदभार स्वीकारला आहे. केंद्रीय बँकेच्या बुधवारी जारी केलेल्या अधिकृत निवेदनानुसार, ही नवी नोट महात्मा गांधी सीरीजच्या सध्याच्या 50 रुपयांच्या नोटांप्रमाणेच असेल. त्यामुळे ग्राहक आणि व्यापाऱ्यांसाठी कोणताही गोंधळ होणार नाही. तसेच, सध्या चलनात असलेल्या 50 रुपयांच्या जुन्या नोटादेखील वैध राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
महात्मा गांधी (नवीन) सीरीजमधील 50 रुपयांच्या नोटेचे आकारमान 66 मिमी X 135 मिमी असेल. नोटेचा मुख्य रंग फ्लोरोसेंट निळा असेल. नोटेच्या पुढील बाजूस महात्मा गांधी यांचा प्रतिमा आणि स्वच्छ भारत अभियानाचा लोगो असेल. तर, मागील बाजूस रथासह हंपीचे चित्र असेल, जे भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा दर्शवते.
2022 मध्ये संजय मल्होत्रा यांना केंद्र सरकारने आरबीआयच्या गव्हर्नरपदी नियुक्त केले होते. त्याआधी ते डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेस (DFS) चे सचिव म्हणून कार्यरत होते. 1990 बॅचचे राजस्थान कॅडरचे वरिष्ठ अधिकारी असलेल्या मल्होत्रा यांनी नोव्हेंबर 2020 मध्ये आरईसीचे चेअरमन आणि एमडी म्हणूनही जबाबदारी सांभाळली होती. त्याशिवाय, त्यांनी काही काळ ऊर्जा मंत्रालयात अतिरिक्त सचिव पदावरही काम पाहिले आहे.
महत्त्वाची सूचना
50 रुपयांची नवी नोट लवकरच चलनात येणार असून ती जुन्या नोटांसोबतच वैध असेल. कोणतेही नवीन सुरक्षा बदल जाहीर न केल्यामुळे नोटेचा मूळ डिझाइन आणि वैशिष्ट्ये कायम राहणार आहेत. ग्राहकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीची वाट पाहावी. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या या घोषणेनंतर आता नवीन नोट केव्हा जारी केली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.









