---Advertisement---
बोस्टन : कर्करोग हा असा आजार आहे ज्यावर अद्याप कोणतेही औषध सापडलेले नाही. शास्त्रज्ञांनी आता अशी एक रक्त चाचणी शोधली आहे. ज्यामळे १० वर्षांपूर्वीच कर्करोगाचा धोका लक्षात येऊ शकतो. या रक्त चाचणीमुळे मानेचा आणि डोक्याचा कर्करोग लक्षात येऊ शकतो. परिणामी, लवकर उपचार सुरू करता येऊ शकतात. यामुळे रुग्णांना कमी तीव्रतेची औषधे देऊनही कर्करोगावर नियंत्रण मिळवणे शक्य आहे.
हार्वर्ड विद्यापीठाशी संलग्न असलेल्या मास जनरल ब्रिघमच्या संशोधकांनी जर्नल ऑफ द नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये या रक्त चाचणीबाबतचे निष्कर्ष प्रकाशित केले आहेत. या निष्कर्षात कर्करोगाचे निदान लवकर झाल्याने रुग्णावर केलेले उपचार यशस्वी ठरू शकतात. ह्युमन पॅपिलोव्हायरस यालाच एचपीव्ही असे म्हणाता. अमेरिकेत एचपीव्ही हा विषाणू अंदाजे ७० टक्के डोके आणि मानेचा कर्करोग होण्यासाठी जबाबदार आहे. या विषाणूमुळे होणारा कर्करोग हा सर्वात समान्य असल्याचे अभ्यासातून दिसून आले आहे. मात्र, एचपीव्हीमुळे होणाऱ्या कर्करोगाचे निदान करण्यासाठी कोणतीही स्क्रिनिंग चाचणी नाही.
या समस्येचे निराकरण करण्यासाठी संशोधकानी ‘एचपीव्ही डीपसीक’ नावाची एक नवीन लिक्विड बायोप्सी चाचणी विकसित केली आहे. या चाचणीमुळे कर्करोगाचे निदान होण्यासपूर्वी एचपीव्हीशी संबंधित डोके आणि मानेच्या आजाराचा धोका समजू शकतो. कर्करोगाचे निदान होण्यापूर्वी आणि लक्षणे नसलेल्या व्यक्तींमध्ये एचपीव्हीशी संबंधित कर्करोग अचूकपणे शोधल्याचे अभ्यासातून पहिल्यांदाच दिसून आल्याचे अभ्यासाचे प्रमुख लेखक आणि हार्वर्ड मेडिकल स्कूलमधील ऑटोलॅरिन्गोलॉजी डोके आणि मान शस्त्रक्रियेचे सहाय्यक प्राध्यापक डॅनियल एल फॅडेन म्हणाले.
मशीन लर्निंग मॉडेलचा वापर
संशोधकांनी चाचणीची कार्यक्षमता सुधारण्यासाठी मशीन लर्निंग मॉडेलचा वापर केला. यामुळे निदानाच्या १० वर्षांपूर्वी गोळा केलेल्या नमुन्यांसह २८ पैकी २७कर्करोगाची प्रकरणे अचूक ओळखणे शक्य झाले.
अभ्यासाची पद्धत
या अभ्यासासाठी संशोधकांनी ५६ नमुन्यांची चाचणी केली. यात अशा २८ नमुन्यांची चाचणी करण्यात आली, ज्यांना काही वर्षानंतर कर्करोग झाला आणि २८ अशा नमुन्यांची चाचणी करण्यात आली जे निरोगी होते. नवीन रक्तचाचणीने कर्करोग झालेल्या २८ जणांपैकी २२ रक्त नमुन्यांमध्ये एचपीव्ही ट्यूमर डीएनए शोधण्याला यश मिळाले. उर्वरित २८ जणांची चाचणी नकारात्मक आली. यावरून ही चाचणी प्रभावी असल्याचे लक्षात येते.