जळगाव विभागात नवीन बसगाड्या लवकरच दाखल होणार : भगवान जगनोर

एरंडोल  : राज्यातील सर्व बस आगारांसाठी ५ हजार नवीन बसगाड्या देण्याची घोषणा  मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांनी केली असून यापैकी जळगाव विभागाला ३३० नवीन बसगाड्यांचा पुरवठा करण्यात येईल अशी माहिती राज्य परिवहन महामंडळाचे जळगाव विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांनी येथे दिली.
        सोमवार १५ जुलै  रोजी एरंडोल बस आगारात प्रवासी राजा दिन व कामगार पालक दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी ते अध्यक्ष पदावरून बोलत होते. यावेळी भगवान जगनोर यांनी फित कापून प्रवासी राजा मेळावा व कामगार पालक मेळाव्याचे उद्घाटन केले. याप्रसंगी विभागीय वाहतूक अधिकारी दिलीप बंजारा व कामगार वाहतूक अधिकारी कमलेश भावसार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती.
        नवीन बसगाड्या, एरंडोल बसस्थानक आवारात मुरूम व कच टाकणे, बसस्थानकात नियमित साफसफाई करणे, बसस्थानकातील ध्वनीक्षेपणात बिघाड झाल्यास त्वरित दुरुस्ती करणे, स्थानकातील सिलिंग फॅन सुरू करणे, गाड्या फलाटांवर लावणे, बसस्थानकाच्या इमारतीलगत बेशिस्त वाहन पार्किंगला आळा बसवणे, बसस्थानक इमारतीच्या परिसरात नियमित साफसफाई होणे, बसस्थानकाच्या फलाटांवर तुटलेल्या फरशांच्या जागेवर नवीन बसवणे, बसस्थानकाचे सुशोभीकरण करून आनंददायी वातावरण तयार करणे, ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी पुरेशा प्रमाणात बससेवा उपलब्ध करून देणे, एरंडोल येथून शिरपूर व नंदुरबार बससेवा सुरू करणे अशा मागण्या प्रवाशांकडून करण्यात आल्या.
         इंधन बचत व प्रवाशांची सुरक्षितता विचारात घेऊन समांतर रस्त्यांच्या रूंदीकरणासाठी महामार्ग प्राधिकरणाकडे पाठपुरावा करणे,मुख्य प्रवेशद्वारालगत खोदलेली चारी गटारीचे बांधकाम त्वरित होणे,चारीलगतची कच्ची अतिक्रमणे त्वरित हटवणे यासाठी जिल्हा पातळीवरील एस टी प्रशासनाने स्वतः पाठपुरावा करावा.अशी अपेक्षा बोलून दाखवण्यात आली.
       प्रवाशांच्या तक्रारी मागण्या व अपेक्षा ह्या एस टी महामंडळ प्रशासनाने विचारात घेऊन खऱ्या अर्थाने बहुजन हिताय व बहुजन सुखाय अशी बससेवा दिली पाहिजे असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते भगवान महाजन यांनी यावेळी केले.
       दुपारी कामगार पालक मेळावा होऊन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या समस्या मांडल्या.अधिकारी वर्गाकडून त्यांचे निरसन करण्यात आले.
         प्रास्ताविक आगार व्यवस्थापक निलिमा बागुल यांनी केले. सूत्रसंचालन रवि पाटील यांनी केले. यावेळी साधना हायस्कूल,कासोदाचे पी. एल. मोरे, आडगाव हायस्कूलचे पर्यवेक्षक संजय पाटील, किशोर मोराणकर, विजय पाटील, चौधरी व आदी उपस्थित होते.