जळगाव : प्रादेशिक दळणवळण व्यवस्था (कनेक्टिव्हिटी) वाढविण्यासाठी केंद्र सरकारने १२० नवीन स्थळांना जोडण्यासाठी सुधारित उडान योजना शनिवारी केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केली. यात दोन कंपन्यांकडून विमानसेवा सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार जळगाव विमानतळावरून नवीन विमानसेवा सुरू होण्याचे संकेत आहेत.
जिल्ह्याचे दोन्ही खासदार, स्थानिक लोकप्रतिनिधींनी जळगाव विमानतळावरून हवाई वाहतूक सेवा उपलब्ध होण्यासाठी पाठपुरावा करणे गरजेचे असल्याची जळगावकरांकडून अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
उद्योग-व्यवसायांना मिळेल गती
जळगाव विमानतळावरून मुंबई, गोवा, हैद्राबाद व पुणे अशी विमानसेवा आहे, तर आगामी काळात नियमित प्रवासी, औद्योगिक व व्यावसायिक सेवा विस्तारासाठी अतिरिक्त विमानसेवा वाहतुकीची आवश्यकता आहे. यात दिल्ली, जयपूर, तिरुपती व इंदूर या शहरांसाठी विमानसेवा सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव नागरी उड्डाण विभागास यापूर्वीच देण्यात आला आहे.
जळगाव शहर महत्त्वाचे केंद्रबिंदू
केळी, डाळ, सुवर्ण बाजारपेठ, कृषी सिंचन साहित्य उत्पादने तसेच चटई, प्लास्टिक उद्योग याशिवाय अन्य महत्वाचे उद्योग, व्यापाराच्या महत्वाच्या दृष्टिकोनातून जळगाव विमानतळ महत्त्वाचे केंद्रबिंदू ठरणार आहे.
विमानतळावर सुविधांचा अभाव
येथील विमानतळावरून सध्या पुणे, हैद्राबाद आणि गोवा येथे नियमित फेऱ्या सुरू आहेत. मात्र, सद्यःस्थितीत अजूनही या विमानतळावर प्रवासी सेवा-सुविधांचा अभाव आहे. प्रवाशांना शहरात येण्यासाठी टॅक्सी अथवा अन्य प्रवासी वाहनसेवा उपलब्ध नाही.
व्हीआयपी व्यक्तींचे आगमन-प्रस्थान
मुख्यमंत्री, राज्यपाल, इतकेच नव्हे; तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील या विमानतळावर दोन ते तीन वेळा आले आहेत, तसेच मंत्री गिरीश महाजन यांच्यासह जिल्ह्यातील खासदार, आमदार याच विमानतळावरून प्रसंगी मुंबई, पुणे गाठतात. असे असले, तरीही विमानतळाविषयी लोकप्रतिनिधींकडून पाठपुराव्याचा अभाव दिसून येत आहे.
मुख्यमंत्र्यांनी घेतली होती बैठक
खासदार स्मिता वाघ यांनी केंद्रीय मंत्र्यांची दिल्ली येथे भेट घेतली, तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे जळगाव विमानतळ सेवा व विस्तारासंदर्भात सहा जानेवारीला बैठक घेतली होती.
व्यापारवृद्धीसाठी विमानसेवा आवश्यक
जळगाव विमानसेवा ही एक जलद, कमी वेळात इच्छितस्थळी पोहोचविणारे व्हीआयपी सुविधा आहे. आजकाल रेल्वेने कुणी व्यापारी येत नाही, मोठे व्यापारी व्यवहार करण्यासाठी मुंबईपर्यंत येतात, पुढे जळगावसाठी रेल्वेने येणे त्यांना सोयीचे नाही.
– प्रेम कोगटा (विमानतळ सल्लागार समिती सदस्य तथा व्यापारी)