चीनमधून डोकं वर काढलेल्या कोरोना विषाणूच्या संसर्गानं पाहता पाहता सारं जग व्यापलं आणि सगळीकडेच Lockdown पर्यंतची परिस्थिती ओढावली. कोरोना विषाणूच्या साथीतून जग सावरलेले असताना चीनमध्ये ह्यूमन मेटान्यूमोव्हायरस (एचएमपीव्ही) या आजाराचे रुग्ण वाढत असल्याचा दावा करण्यात येत आहे. यामुळे कोरोनानंतर पाच वर्षांनी पुन्हा आणखी एका आरोग्य संकट येणार का, अशी शंका व्यक्त होत आहे.
रुग्णालयांमध्ये लांबच लांब रांगा
चीनमध्ये सध्या रुग्णालयांमध्ये लांबच लांब रांगा पाहायला मिळत असून, इथं नागरिकांनी पुन्हा एकदा सक्तीनं मास्कचा वापर सुरू केला आहे. चीनमध्ये सध्या सुरू असणाऱ्या घडामोडी संशयास्पद असल्याचं म्हणत जागतिक स्तरावरील वृत्तसंस्थांमध्ये हे राष्ट्र पुन्हा एकदा जगाला संकटात टाकू शकतं याविषयीची शंका व्यक्त केली जात आहे.
HMPV नावाचा विषाणू
हे सर्वकाही HMPV नावाच्या एका विषाणूजन्य आजारामुळं घडत असल्याचं सांगण्यात येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार सध्या चीनमध्ये चार विषाणूंचा संसर्ग फोफावला असून, इथं एचएमपीव्ही म्हणजेच माइकोप्लाज्मा निमोनिया अतिशय झपाट्यानं पसरत असल्यानं आरोग्य यंत्रणाही चिंतेत आल्या आहेत. या विषाणूची एकंदर रचना कोरोनाच्या विषाणूप्रमाणंच असून तो हवेमार्फत संक्रमित होत असल्याचं सांगण्यात येत आहे.
एचएमपीव्ही’च्या आजारात फ्लूसारखी लक्षणे आढळतात.यामुळे विशेषत: लहान मुले आणि ज्येष्ठांमध्ये श्वसनाच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात.या साथीच्या फैलावावर चिनी आरोग्य अधिकारी लक्ष ठेवून असल्याचेही सांगण्यात येते आहे.
अमेरिकेच्या ‘सेंटर्स फॉर डिसिज कंट्रोल अँड प्रीव्हेंशन’ (सीडीसी) या सार्वजनिक आरोग्य संघटनेनुसार सर्व वयोगटातील व्यक्तींना याचा संसर्ग होऊ शकतो. विशेषतः लहान मुले, वृद्धांसह ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेली आहे, अशा व्यक्तींना त्याची लागण लवकर होते.
’एचएमपीव्ही’ची लक्षणे
फ्लू आणि श्वसनाच्या इतर संसर्गाप्रमाणेच लक्षणे
खोकला, ताप, नाक बंद होणे आणि श्वास घ्यायला त्रास होणे, अशी सामान्य लक्षणे
गंभीर स्थितीमध्ये या विषाणूमुळे ब्राँकायटिस किंवा न्यूमोनियासारखे आजार उद्भवू शकतात
संसर्गानंतर तीन ते सहा दिवसांनी याची लक्षणे दिसतात
संसर्गाच्या प्रमाणानुसार आजाराचा कालावधी वेगवेगळा असू शकतो