---Advertisement---
राज्यात सध्या अशोक खरात प्रकरणामुळे मोठी चर्चा रंगली आहे. नाशिकमधील एका महिलेने भोंदू अशोक खरातविरुद्ध अत्याचाराची तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदवून त्याला अटक केली. त्यानंतर तपास पुढे सरकत असताना त्याच्या विविध कृत्यांची माहिती समोर येऊ लागली असून, या प्रकरणाने अधिकच गांभीर्य घेतले आहे. महिला अत्याचार आणि फसवणुकीशी संबंधित अनेक गुन्ह्यांमध्ये त्याचे नाव समोर आले आहे. या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी एसआयटीची नियुक्ती करण्यात आली असून चौकशी सुरू आहे.
दरम्यान, या प्रकरणात आता आणखी एक महत्त्वाचा धागा पुढे आला आहे. रुपाली चाकणकरांची बहिण प्रतिभा चाकणकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिर्डी पोलिसांनी त्यांना नोटीस बजावून चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे.
अशोक खरातविरोधात शिर्डी येथे सावकारीसंदर्भात गुन्हा दाखल असून त्याच्या तपासादरम्यान काही आर्थिक व्यवहार संशयास्पद आढळले. समता पतसंस्थेतील अनेक खात्यांमध्ये वेगवेगळ्या व्यक्तींची नावे असली तरी त्यांचे नॉमिनी म्हणून अशोक खरातचे नाव असल्याचे समोर आले आहे. या खात्यांमधून कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
या पार्श्वभूमीवर प्रतिभा चाकणकर आणि त्यांच्या मुलाच्या नावावरही या पतसंस्थेत चार खाती असल्याचे उघड झाले आहे. या सर्व खातेदारांचे जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असून आतापर्यंत 33 जणांची चौकशी करण्यात आली आहे. प्रतिभा चाकणकर यांना देखील जबाब नोंदवण्यासाठी पुढील पाच दिवसांत शिर्डी पोलीस ठाण्यात उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यांच्या दोन वेगवेगळ्या पत्त्यांवर ही नोटीस पाठवण्यात आली आहे.
दरम्यान, अशोक खरातसोबतचे काही फोटो समोर आल्यानंतर राज्यातील काही राजकीय व्यक्तींवरही दबाव वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. या प्रकरणाचा तपास पुढे जात असताना आणखी काही महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.









