हिंदू नव वर्षाचा आरंभ व्हायला अद्याप वेळ असला तरी २०२५ हे इंग्रजी नवीन वर्ष आजपासून सुरू झाले आहे. एकविसाव्या शतकाच्या पहिल्या पाव भागातले हे शेवटचे वर्ष. भारताचे आराध्य दैवत असलेल्या रामललाच्या मूर्तीची अयोध्येतील भव्य श्रीराम मंदिरात प्राणप्रतिष्ठा होऊन २०२४ हे वर्ष सुरू झाले होते आणि गुकेश डोम्माराजूने बुद्धिबळातील जगज्जेता म्हणून भारताचे नाव इतिहासात कोरले तेव्हा हे वर्ष संपायला आले होते. मनोहर जोशी, पंकज उदास यांच्यासारख्या नामवंतांचा मृत्यू, काही नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्ती असे बरेच काही दुःखद २०२४ मध्ये घडले. तरीही या वर्षाचा एकूण बाज हा सकारात्मक, विधायक अशा स्वरूपाचा होता. भारताचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा शपथ घेतली. २०२४ मध्ये भारताचा ७५ वा प्रजासत्ताक दिन पार पडला. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. जम्मू काश्मिरात विधानसभेची निवडणूक झाली. पाच हजार कोटी रुपये खर्चुन पार पडलेल्या अंबानींकडल्या लग्नाने देशाचेच नव्हे, तर जगाचे डोळे विस्फारले. भारतीय न्याय संहितेसह तीन नवे कायदे तसेच पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातील हिंदू, शीख, जैन, ख्रिश्चन, बौद्ध आणि पारशी समुदायांना दिलासा देणारा सिटिझनशिप अमेंडमेंट अॅक्ट हा कायदा अंमलात आला. इलेक्टोरल बॉण्ड स्किम घटनाबाह्य असल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला. याच वर्षात माओवाद्यांच्या विरोधात ठोस कारवाई सुरू झाली आणि त्यांच्या निःपातासाठी निर्णायक पावले पडतानाही दिसली. भारत आणि चीन यांच्यातील सीमावाद सोडवण्याच्या दिशेने सकारात्मक प्रयत्न सुरू झालेत. पॅरिसच्या ऑलिम्पिकमध्ये भारताने चांगली कामगिरी बजावली. इसोने २०२४ मध्ये बऱ्याच महत्त्वाकांक्षी मोहिमा यशस्वी केल्या. आदित्य-एल-वन ही त्यातील सर्वांत महत्त्वाची मोहीम. आरजी कार मेडिकल कॉलेजमधील बलात्काराचे प्रकरण देशभर गाजले. त्या घटनेचे दुखणे अजून संपलेले नाही. अशा विषयांवरचा आक्रोश संपू देखील नये. कारण आक्रोश सुरू राहिला तरच अशा घटनांच्या प्रतिबंधासाठी ठोस पावले उचलली जाण्याची शक्यता वाढत असते. २०२४ हे वर्ष बव्हंशी आश्वासक राहिले असले तरी अशा काही घटनांनी चिंतेचे वातावरण देखील निर्माण केले होते, हे आपल्याला विसरता येणार नाही. जम्मू-काश्मिरात यशस्वीरीत्या विधानसभेची निवडणूक पार पडली असली तरी याच वर्षात हिंदू भाविकांवर लष्कर-ए-तोयबाच्या अतिरेक्यांनी हल्ला केला आणि नऊ जणांचे जीव घेतले, हेही आपल्याला विसरता येणार नाही. सीमावर्ती भागांत अनेक जवानांना हौतात्म्य आले, रेल्वेचे अपघात झाले, इमारती कोसळल्या आणि माणसं मेली, उत्तर भारतात अतिवृष्टीने शेकडोंचे जीव गेले, इस्पितळांमध्ये आग लागून चिमुकल्यांचे जीव गेले अशा अनेक घटना आहेत, ज्यांचे विस्मरण होता कामा नये. २०२५ या इंग्रजी नव्या वर्षाचा आरंभ करताना अशा दुःखद घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी सर्वप्रथम आपण सर्वांनी संकल्प केला पाहिजे. २०२४ मध्ये अयोध्येत रामललाची प्राणप्रतिष्ठा झाली. आता २०२५ मध्ये मथुरा मुक्त व्हावी, हाही तमाम भारतीयांसाठी संकल्पाचा विषय असला पाहिजे.
२०२४ हे लोकसभा निवडणुकीचे वर्ष होते. महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये देखील निवडणुका झाल्या. २०२५ मध्ये दिल्ली विधानसभा आणि बिहार विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. २०२४ मध्ये भाजपाच्या विरोधकांनी ईव्हीएमच्या नावाने बोंबा ठोकल्या. पण, त्यात त्यांना यश आले नाही. आता २०२५ मध्ये तरी विरोधकांनी सुधरले पाहिजे आणि निवडणुकीच्या माध्यमातून जनतेने दिलेल्या कौलाचा सन्मान करायला शिकले पाहिजे. १४० कोटी लोकसंख्येचा भारत प्रगतीच्या मार्गावर अग्रेसर झाला आहे. त्यासाठी गेल्या दशकभरातील मोदी सरकारची कारकीर्द हे प्रमुख कारण ठरले. ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञानातील महाशक्ती म्हणून भारताचे नाव आता जगात मान्यता पावलेले आहे. भारताचा अंतराळ कार्यक्रम राष्ट्रीय प्रतिष्ठेचा तर आहेच, शिवाय तो प्रगत तंत्रज्ञानातील देशाच्या क्षमतेचे प्रतीक आहे. यासोबतच डिजिटल इंडिया उपक्रम २०२५ मध्ये नवी उंची गाठेल, फाईव्ह जी आणि सिक्स जी नेटवर्कच्या दिशेने पावले पडतील. कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग, इंटरनेट ऑफ थिंग्ज आणि ब्लॉकचेनमधील प्रगतीची नवी शिखरे भारताला खुणावत आहेत. या साऱ्या आश्वासक गोष्टी आहेत. मात्र, काही आव्हाने देखील आहेत.
शेती-शेतकरी, शिक्षण, आरोग्य, सामाजिक सौहार्द आणि वातावरणातील प्रतिकूल बदल या विषयांकडे २०२५ मध्ये सरकार आणि समाजाने विशेष लक्ष घातले पाहिजे. भारत हा अद्याप कृषिप्रधान देश आहे. त्यामुळे शेतीची स्थिती सुधारल्याखेरीज देशाचे अर्थकारण फार प्रगत होऊ शकत नाही. शिक्षण प्रक्रियेचे सबलीकरण व पूर्ण सामाजिकीकरण केल्याखेरीज शिक्षणाची दारे समाजातील शेवटच्या घटकांसाठी उघडली जाऊ शकणार नाहीत. आरोग्याच्या समस्या वाढत चाललेल्या आहेत. वैद्यकीय व्यवसायात नको तितका धंदेवाईकपणा आलेला आहे. त्यामुळे सरकारने आरोग्य यंत्रणा सुधारण्यावर भर दिला पाहिजे, जेणेकरून खाजगी वैद्यकीय सेवेवरील अवलंबित्व किमान पातळीवर येईल. सामाजिक सौहार्दासाठीही सरकार आणि समाजाला, विशेषतः समाज धुरिणांना विशेष प्रयत्न करावे लागतील. देवादिकांच्या नावावर भांडण-तंटे होऊ नयेत, पण ज्यांना तसे करण्याची खुमखुमी असते, त्यांना दट्ट्या देण्याची आपल्याला तयारी ठेवावी लागेल. पर्यावरणाचा तोल बिघडलेला आहे. तज्ज्ञांचे म्हणणे असे आहे की, पर्यावरणातील बदलांचा अधिक तीव्र प्रभाव २०२५ पासून जाणवायला लागेल. आताही तो कमी नाही. दिल्लीत मोकळा श्वास घेता येत नाही. वायुप्रदूषण, जलप्रदूषण, ध्वनिप्रदूषण, पाण्याची टंचाई, स्वच्छता असे सर्व विषय सरकार आणि समाजाने प्राधान्यक्रमाने हाताळण्यासाठी घेतले पाहिजेत. ऊर्जा सुरक्षितता सुनिश्चित करण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून सौर आणि पवन ऊर्जेची स्वीकारार्हता वाढवावी लागेल. शहरे कचरा आणि घाणमुक्त करावी लागतील. शहरांचे ढिसाळ नियोजन आणि शहरांवर येत असलेला लोकसंख्येचा ताण हा गंभीर विषय आहे. गावे राहण्याजोगी नाहीत आणि शहरांमध्ये श्वास घेता येत नाही, असा हा तिढा आहे. शेती आणि ग्रामीण उद्योग यांत प्रगती झाली तर शहरांमध्ये येणारे लोंढे थांबतील. शहरांचे नियोजन व्यवस्थित केले तर तेथे राहणे आनंददायी होईल. अर्थकारण वाढणार आहे, असा अंदाज आहे. पण, निव्वळ अर्थकारण वाढून भारताचे भागणार नाही. १४० कोटी लोकसंख्येतील प्रत्येकाला या अर्थकारणातील वृद्धीचा लाभ मिळायला हवा. बेरोजगारी संपायला हवी. भारताच्या आर्थिक विकासाचे फायदे समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचतील याची सरकारने खातरजमा केली पाहिजे. गरिबी, असमानता आणि दर्जेदार आरोग्यसेवा आणि शिक्षणाचा अभाव या समस्यांवर लक्ष्यित कल्याणकारी कार्यक्रमांद्वारे प्रभावी उपाय करणे आवश्यक आहे. महिला, दलित आणि ग्रामीण लोकसंख्येसारख्या उपेक्षित गटांवर विशेष लक्ष दिले पाहिजे. देश म्हणजे सरकार नसते. देश म्हणजे देशातील माणसं असतात. ती जितकी विचारी, संयमी आणि दूरदृष्टीची असतील, तितका चांगला देश घडत असतो. सरकार देश चालवू शकते. देश घडवण्याची जबाबदारी ही समाजाची आणि त्यातही विविध क्षेत्रांत समाजाचे, समुदायांचे नेतृत्व करणाऱ्यांची असते. ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणाऱ्यांच्या देशात किंवा बुद्धिबळात जगज्जेता ठरलेल्या बालकाच्या देशात युवकांना नोकरी नसणे किंवा बालकांना शिक्षणाच्या सोयी नसणे यापुढे तरी आपल्याला लज्जास्पद वाटले पाहिजे. त्यासाठी आग्रह धरणारी व्यासपीठे आहेत. संघटना आहेत. त्यांनी सरकारवर दबाव आणला पाहिजे आणि समाजाच्या कल्याणाचे काम करून घेतले पाहिजे. आपले अर्थकारण वाढेल. ते वाढत राहील. आपला देश जागतिक नेतृत्व करण्याच्या क्षमतेचा झाला आहे. त्याचीही प्रतिष्ठा वाढत राहील. परंतु, कोणत्याही उंचीचे स्थैर्य त्याच्या मजबूत पायावर ठरत असते. सुखी, संपन्न, समाधानी, समृद्ध समाज हा अशा प्रकारे विकसित होत असलेल्या देशाचा पाया असतो. एकविसाव्या शतकाचा एक चतुर्थांश भाग संपायला आलेला असताना, तसा देश घडवण्याच्या दिशेने नवा आरंभ करणारे वर्ष म्हणून २०२५ कडे पाह्या आणि कृतिशील होऊया. सर्वांना आंग्ल नवीन वर्षाच्या शुभेच्छा