---Advertisement---
जळगाव : सध्या पावसाळा सुरू असल्याने, खरीप हंगामात शेतकरी व्यस्त झाला आहे. दरम्यान, बाजार समितीमध्येही शेतमालाची आवक कमी-जास्त होताना दिसत आहे. जळगाव बाजार समितीमध्ये ज्वारीच्या दरात अचानक वाढ झाली असून, सोमवारी २२०० रुपये क्विंटल एवढा भात असलेल्या ज्वारीचा दर ३ हजार ३७१ रुपयांवर पोहोचला आहे.
दुसरीकडे पावसाळ्यात देखील बाजार समितीत शेतमालाची कमी-जास्त प्रमाणात आवक सुरूच आहे. सोमवार, १४ जुलै रोजी ज्वारीची केवळ २ क्विंटल एवढी आवक होती. गुरुवारी मात्र बाजार समितीत तब्बल ७६४ क्विंटल एवढी आवक होती. विशेष म्हणजे आवक वाढल्यानंतर दरात घट होत असते. मात्र, बाजार समितीत आवक वाढल्यानंतर दरात वाढ झालेली दिसून येत असून, तीनच दिवसात ज्वारीच्या दरात ११०० रुपयांची वाढ झाली आहे.
भाव वाढण्याचे काय आहे कारण ?
ज्वारीचे अचानक भाव वाढीमागे सध्या ज्वारीची सुरू असलेली शासकीय खरेदी हे कारण आहे. शेतकऱ्यांचा कल शासकीय खरेदीवर आपला माल विक्री करण्यावर आहे. त्यामुळेच व्यापाऱ्यांकडे माल येत नाही, त्यामुळे जो माल येत आहे, तो माल जास्त भावात खरेदी करण्यावर भर असल्याचे कारण बाजार समितीचे सचिव यांनी दिले.
दरम्यान, ज्वारीला चांगला भाव मिळत असताना, तुरीचे दर मात्र हमीभावापेक्षा कमी असल्याचे चित्र आहे. तुरीचा हमीभाव ७५५० रुपये प्रति क्विंटल असला तरी, १६ जुलै रोजी बाजार समितीत तुरीची आवक ३८ क्विंटल असून, भाव केवळ ४९०० रुपये प्रति क्विंटल होता. सद्यःस्थितीत तुरीला बाजारात मागणी नसल्यामुळे दरात घसरण झाल्याचे बोलले जात आहे.
असे आहेत दर (१७ जुलै)
शेतमालाचा प्रकार आवक – दर (क्विंटलमध्ये)
हरभरा चाफा २० क्विंटल -५६००
हरभरा चिणोली – ६ क्विंटल – ५१००
दादर- ३९ क्विंटल – २७००
सोयाबीन – ०५ क्विंटल – ४१०० ते ४२००
ज्वारी – ७६४ क्विंटल – ३३७१