---Advertisement---
ओडिशाच्या सुंदरगडमधील दगडाच्या खाणीत जाणारी चार हजार किलो स्फोटकांची लूट झाल्याच्या प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्था अर्थात् एनआयएने ११ माओवाद्यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली.
सर्व आरोपींवर बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायदा, भारतीय न्याय संहिता, शस्त्रास्त्र आणि स्फोटके प्रतिबंधक कायद्यातील विविध तरतुदींच्या आधारे एनआयएने गुरुवारी विशेष न्यायालयात हे आरोपपत्र दाखल करण्यात आले. तपासामध्ये हे ११ माओवादी गुन्हेगारी कट रचणे, त्याची अंमलबजावणी करीत प्रत्येकी २० किलो स्फोटकांची २०० पाकिटांची लूट करण्यात सहभागी असल्याचे निष्पन्न झाले. या स्फोटकांची वाहतूक ईतमा एक्स्प्लोजिव्ह स्टेशनवरून बानको येथील दगडांच्या खाणीकडे केली जात होती.
१० ते १५ सशस्त्र माओवाद्यांनी स्फोटकांचा ट्रक बळजबरीने थांबवला आणि तो शेजारील राज्य झारखंडमधील सारंडा जंगलात नेला. या वर्षी जूनमध्ये एनआयएने स्थानिक पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास हाती घेतला. पोलिस आणि सुरक्षा दलांसह सरकारी यंत्रणेविरुद्ध दहशतवादी कृत्येकरण्यासाठी मोठ्या प्रमाणात स्फोटकांचा साठा लुटण्यात आला होता.









