Nipah Virus: या राज्यात निपाह व्हायरसने घेतला 14 वर्षाच्या मुलाचा जीव

केरळमध्ये निपाह व्हायरसने पाय पसरण्यास सुरुवात केली आहे. मलप्पुरम जिल्ह्यात निपाह विषाणूची लागण झालेल्या १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. या मुलावर विषाणूची लागण झाल्याचे आढळून आल्यानंतर त्याच्यावर उपचार सुरू होते, मात्र त्याच्या शरीरात वाढत्या संसर्गामुळे आज (रविवार, 21 जुलै) सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला.

मुलाच्या मृत्यूनंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयानेही केरळच्या मलप्पुरम जिल्ह्यात निपाह विषाणूच्या एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती दिली, त्याला पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (NIV) मध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. सध्या केंद्र सरकारने दिल्लीहून एक टीम पाठवली आहे जी या विषाणूच्या पुढील तपासणीसाठी केरळमध्ये तैनात केली जाईल.

काही वर्षांपूर्वी निपाह व्हायरसचा उद्रेकही दिसून आला होता. या साथीच्या पार्श्वभूमीवर निपाह व्हायरसबाबत केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान म्हणाले की, काही वर्षांपूर्वी केरळमध्ये निपाह विषाणूचा प्रादुर्भाव दिसून आला होता आणि केरळने तातडीने कारवाई केली होती. त्यामुळे मला आशा आहे की सरकार आणि अधिकारी, विशेषत: वैद्यकीय कर्मचारी परिस्थिती नियंत्रणात आणतील.