---Advertisement---
नासा आणि इस्रोच्या संयुक्त मोहिमेतून प्रक्षेपित करण्यात आलेला निसार उपग्रह सक्रिय झाला आहे. पृथ्वीपासून ७४३ किमी उंचीवर असलेल्या या उपग्रहाचा १२ मीटरचा रडार अँटेना अवकाशात यशस्वीरित्या उघडला आहे. जो पृथ्वीवरील बदलांचे मोजमाप आणि निरीक्षण करणार आहे.
३० जुलै रोजी श्रीहरिकोटा येथून प्रक्षेपित केलेला हा उपग्रह हिमनद्या, भूकंप आणि जंगलांवर लक्ष ठेवेल. या मोहिमेतून या वर्षाच्या अखेरीस डेटा मिळेल, जो आपत्ती आणि अन्न सुरक्षेत मदत करेल. पृथ्वीच्या बदलत्या पृष्ठभागाचा अचूक अभ्यास करण्यासाठी निसार उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले.
उपग्रह ९७ मिनिटांत पृथ्वीभोवती प्रदक्षिणा पूर्ण करीत असून आगामी १२ दिवसात ११७३ प्रदक्षिणा पूर्ण करून तो पृथ्वीच्या प्रत्येक भागाचा नकाशा तयार करणार आहे. ढग, घनदाट जंगले, धूर आणि अंधारातही तो कार्यक्षम असेल. निसारकडून मिळालेल्या डेटाच्या आधारे शास्त्रज्ञ हवामान बदल, नैसर्गिक आपत्ती, पर्यावरणाचा अधिक चांगल्याप्रकारे अभ्यास करू शकणार आहे.
अँटेनाचे वजन ६४ किलो
नासाच्या जेट प्रोपल्शन लॅबोरेटरीचे प्रोजेक्ट मॅनेजर फिल बरेला म्हणाले की, हा नासाचा आतापर्यंतचा सर्वात मोठा अँटेना रिफ्लेक्टर आहे. तो अंतराळात यशस्वीरित्या उघडणे हे वर्षानुवर्षे केलेल्या डिझाइन, चाचणी आणि सहकार्याचे परिणाम आहे. या अँटेनाचे वजन ६४ किलोग्रॅम आहे. ते १२३ कंपोझिट स्ट्रट्स आणि सोन्याचा मुलामा असलेल्या जाळीने बनलेले आहे.