मिरवणूकीच्या बसवर टीका करणारे रोहित शर्माच्या मागे फोटोसाठी पळत होते! नितेश राणेंची रोहित पवारांवर टीका

मुंबई : मिरवणूकीतील खेळाडूंच्या बसवर टीका करणारे सायंकाळी फोटो काढण्यासाठी रोहित शर्माच्या मागे पळत होते, अशी टीका भाजप आमदार नितेश राणेंनी रोहित पवारांवर केली आहे. टीम इंडियाच्या मुंबईतील मिरवणूकीकरिता गुजरातवरून आणलेल्या ओपन बसवर विरोधकांनी टीका केली होती. यावर आता राणेंनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले.

नितेश राणे म्हणाले की, “अदानींचा एक खास ड्रायव्हर महाविकास आघाडीमध्ये आहे. तो मुंबईत आल्यावर अदानींची गाडी चालवतो. तोच ड्रायव्हर काल सकाळी मिरवणूकीच्या बसवर टीका करत होता. आणि संध्याकाळी वानखेडे स्टेडियममध्ये रोहित शर्मासोबत फोटो काढण्यासाठी त्याच्यामागे पळत होता. हा डबलढोलकीपणा महाराष्ट्रासमोर यायला हवा,” अशी खोचक टीका त्यांनी रोहित पवारांचे नाव न घेता केली आहे.

यावेळी त्यांनी संजय राऊतांवरही जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले की, “केंद्रात एक राहुल गांधी नावाचे बालबुद्धी आहे आणि महाराष्ट्रात भांडुपमध्ये बसलेला एक बालबुद्धी आहे. यापैकी कुणाची बुद्धी लहान आहे याची त्यांच्यात स्पर्धा सुरु आहे. काल क्रिकेट संघाच्या स्वागतासाठी वापरली गेलेली बस गुजरातच्या नंबर प्लेटची होती. त्यामुळे लगेच त्यांना गुजरातच्या नावाने मिर्च्या झोंबल्या. त्यांच्या मालकाने अंबानींच्या लग्नात नाचून दाखवायचं आणि सकाळी उठून ते गुजरातींच्या नावाने खडी फोडणार. त्यांना हे माहिती नाही की, आपल्याकडे असणाऱ्या ओपन बसेस खराब झालेल्या होत्या. त्यामुळे गुजरातहून बस बोलवण्याचा निर्णय घेण्यात आला. पण त्यात एवढा मोठा बागलबुवा करण्याची काहीच गरज नाही. काँग्रेसवाले सभागृहामध्ये अदानींच्या नावाने बोंब मारतात आणि त्यांचेच नेते अदानींच्या प्रायव्हेट विमानात देशभरात प्रवास करतात,” अशी टीका त्यांनी केली.