Ballot Paper Voting : बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी करणारी जनहित याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली. बॅलेट पेपरद्वारे निवडणुका घेण्याची जनहित याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्याने ईव्हीएममध्ये छेडछाड होत असल्याचा आरोप करणाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे.
राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. यामध्ये महायुतीला मोठं यश मिळालं. राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार स्थापन होणार असल्याने विरोधकांनी ईव्हीएमवर शंका उपस्थित केली. त्यामुळे राज्यात ईव्हीएमचा मुद्दा गाजत असल्याचे पाहायला मिळत आहे.
देशात होणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये बॅलेट पेपरने निवडणुका घेण्याची मागणी करणारी जनहित याचिका दाखल करण्यात आली. ही जनहित याचिका डॉ. केएल पॉल यांची दाखल केली होती. मात्र ही याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे.
न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती पी.बी. वराले यांच्या खंडपीठासमोर मतपत्रिकेवर निवडणूक घेण्याची मागणी करणारी याचिका सुनावणीस आल्यानंतर पराभव झाल्यावरच ईव्हीएममध्ये बिघाड का असतो, विजय झाला तेव्हा हा आरोप का होत नाही, असा सवाल केला आणि मतपत्रिकेवर मतदान घेण्याची मागणी फेटाळली.