जळगाव : स्वयंसेवी संस्था नोबेल विज्ञान प्रसारक बहुउद्देशीय मंडळाच्या नोबेल फाउंडेशन आणि प.न. लुंकड माध्यमिक कन्याशाळेच्या विद्यमाने कन्याशाळेतील 130 हून अधिक विद्यार्थिनींना पुढील तीन महिने जॉइंट एंट्रन्स एक्झाम (जेईई) आणि नॅशनल एलिजिबिलिटी एंट्रन्स टेस्ट (नीट) तसेच एनडीए परीक्षेसाठी विनाशुल्क मार्गदर्शन वर्ग आयोजित केला आहे. याचा शुभारंभ झाला.
याप्रसंगी मुख्याध्यापिका स्वाती नेवे पर्यवेक्षिका, वंदना तायडे, शिक्षक साहेबराव बागुल, लीना कुलकर्णी, भगवान पाटील, मनीषा भादलीकर, नोबेल फाउंडेशनचे अध्यक्ष जयदीप पाटील, संचालक राजेंद्र पाटील, मार्गदर्शक योगेश पाटील, हर्षल ठाकूर, अमोल पवार उपस्थित होते.
या उपक्रमामुळे मध्यमवर्गीय गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थिनींना प्रवेश परीक्षांसाठी गुणवत्तेचे मार्गदर्शन मिळणार आहे. नोबेल फाउंडेशनतर्फे ‘मी आयआयटीयन होणार’ या उपक्रमांतर्गत काही महिन्यांपूर्वी आयआयटी गोल्ड मेडलिस्ट सुकन्या पाटील यांच्या पुस्तकावर आधारित स्पर्धा परीक्षा घेण्यात आली. यात कन्याशाळेतील विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला. यावेळी विद्यार्थिनींना मार्गदर्शनाबद्दल ठरविण्यात आले. सध्याची कोचिंग संस्थांची फी सामान्य पालकाला भरणे शक्य नाही. मात्र मुलींमध्ये प्रचंड गुणवत्ता आहे. या मुलींना उत्तम मार्गदर्शन आठवी, नववीपासून मिळाले तर निश्चितच जेईई नीट सारख्या परीक्षांमध्ये या विद्यार्थिनी मोठे यश मिळवू शकतात. या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला.
नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना तीन महिने मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.