तरुण भारत लाईव्ह : उत्तरेकडून येणार्या थंड वार्यांमुळे उत्तर मध्य महाराष्ट्र तसेच उत्तर मराठवाड्यात गारठा चांगलाच वाढला आहे. त्यामुळे बुधवार सकाळपासूनच जिल्ह्यात तापमानाचा पारा 11 अंशावर आला आहे. तसेच ढगाळ वातावरणामुळे सूर्यदर्शन नसल्याने थंडीचे प्रमाण दिवसभर जाणवून आले. ढगाळ वातावरणामुळे गारठा अजून वाढण्याची शक्यता असून किमान 8 ते 10 अंशापर्यत तापमान राहण्याचा अंदाज हवामान अभ्यासकांनी वर्तविला आहे.
बंगालच्या उपसागरावरून पूर्वेकडे वाहणार्या वार्यांचा जोर कमी झाल्याने, उत्तरेकडील थंड वारे राज्यात पोहोचत आहेत. उत्तर मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर, जळगाव, धुळे, नंदूरबार जिल्ह्यात वातावरणातील गारठा वाढला आहे. मंगळवारी दिवसभराचे तापमान 27 ते 29 अंशावर होते. मात्र बुधवारी सकाळी वातावरणात गारठा वाढून सकाळी 15 अंशांवर तापमानाची नोंद झाली होती. सकाळनंतर काही काळात ढगाळ वातावरणामुळे तापमानात अजून घट होऊन सकाळी 11 वाजता किमान 11 अंश तापमानाची नोंद झाली. यामुळे जिल्हावासियांना गुलाबी थंडीचा अनुभव मिळत आहे. जिल्ह्यात दिवसभर ढगाळ वातावरणामुळे सूर्यदर्शन अत्यंत कमी प्रमाणात झाले त्यामुळे धुकेयुक्त वातावरणाची स्थिती असल्याचेच दिसून आले.