Mahakumbh Mela: प्रयागराज महाकुंभमध्ये सिलिंडर स्फोट नव्हे, खलिस्तानी कट! दहशतवाद्यांची कबुली

प्रयागराज : गेल्या रविवारी (१९ जानेवारी) कुंभमेळ्यात मोठी दुर्घटना घडली. येथील १८० छावण्यांना आग लागली होती. सुरुवातीला हा अपघात सिलिंडरच्या गळतीमुळे घडल्याचे समजले होते, मात्र आता या घटनेमागे कट असल्याचे उघड झाले आहे. प्रयागराजमधील आगीच्या घटनेची जबाबदारी दहशतवादी संघटना खलिस्तान झिंदाबाद फोर्सने घेतली  आहे.

प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यात रविवारी सिलिंडर स्फोटामुळे लागलेल्या भीषण आगीच्या घटनेला आता वेगळं वळण मिळालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खालिस्तानी जिंदाबाद या दहशतवादी संघटनेने या सिलिंडर स्फोटाची जबाबदारी स्वीकारली आहे. संघटनेने माध्यमांना ई-मेल पाठवून घेतली आहे. संघटनेने असे म्हटले आहे, की हा पिलीभीत चकमकीचा बदला आहे.

आगीमुळे १८०  तंबू जळून खाक झाले, परंतु प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे जीवितहानी टळली. घटनेनंतर सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाली असून, महाकुंभ परिसरात तपासणी मोहिमा सुरू करण्यात आल्या आहेत. एनआयए आणि स्थानिक पोलीस तपास सुरू असून, या घटनेच्या पाठीमागील कट रचणाऱ्यांपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

दहशतवादी संघटनेने स्वीकारली जबादारी 

दहशतवादी संघटनेने कॅनडा आणि पंजाबच्या माध्यमांना एक ईमेल पाठवला आहे, ज्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की आमचा उद्देश कोणालाही इजा पोहोचवणे नाही. हे फक्त उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांसाठी एक इशारा आहे. ही तर फक्त सुरुवात आहे. ई-मेलमध्ये फतेह सिंग बागी यांचे नाव लिहिले आहे.

पंजाब आणि उत्तर प्रदेश पोलिसांच्या संयुक्त कारवाईत २३ डिसेंबर रोजी उत्तर प्रदेशातील पिलीभीतमध्ये तीन खलिस्तानी दहशतवाद्यांना ठार मारले होते. तिन्ही दहशतवाद्यांवर पंजाबमधील पोलिस चौकीवर ग्रेनेड हल्ल्याचा आरोप होता. तिघेही पळून गेले होते आणि पिलीभीतमध्ये राहत होते. पंजाब पोलिसांकडून मिळालेल्या माहितीवरून यूपी पोलिसांनी ही कारवाई केली होती. याचाच बदला म्हणून कुंभमेळ्यात सिलेंडर स्फोट घडवून आणल्याचे खालिस्तानी जिंदाबाद फोर्स या दहशतवादी संघटनेने म्हटले आहे.