मुंबई : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलून ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर’ झाल्याची घोषणा केली होती. मात्र आता नगरच्या नामांतराचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आल्याचे दिसते आहे. कारण येथील मुस्लिम समुदायाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर नको, अहमदनगरच हवं, अशी मागणी केली आहे.
शरद पवार हे नुकतेच अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर होते. त्यावेळी जामखेड येथील काही मुस्लीम बांधवांनी पवारांचा सत्कार केला. तेव्हा त्यांनी आम्हाला अहिल्यानगर नको, अहमदनगरच हवं अशा घोषणा दिल्या. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून या व्हिडिओची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे.
अहमदनगरचे नामांतर ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर’ करण्यासाठी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी सरकारकडे कायम पाठपुरावा केला होता. चोंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या २९८ व्या जयंती सोहळ्यात बोलताना देखील त्यांनी ही विनंती केली होती. तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून नामांतराची घोषणा करण्यात आली होती. केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने नामांतराच्या बाबतीत हरकत नसल्याचे पत्र जारी केले आणि अहिल्यानगर नावास मान्यता दिली होती. या नावाचे कोणतेही रेल्वेस्थानक देशात नसल्याचेही त्यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.