Baba Siddiqui Murder Case । फक्त बापाचं नव्हे तर मुलगाही होता शूटरच्या रडारवर

मुंबई : माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांचा १२ ऑक्टोबर रोजी दसऱ्याच्या रात्री गोळ्या झाडून खून करण्यात आला. बाबा सिद्दीकी यांचा मुलगा जीशान सिद्दीकी हे काँग्रेस पक्षाचे आमदार असून त्यांचे वांद्रे येथे कार्यालय आहे. बाबा सिद्दीकी जीशानच्या या कार्यालयात शनिवार, १२ ऑक्टोबर रोजी उपस्थित होते. रात्री जेव्हा बाबा सिद्दीकी हे जीशानच्या कार्यलयातून बाहेर पडताच हल्लेखोरांनी त्यांच्यावर ३ गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले बाबा सिद्दीकी यांना लागलीच लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं, परंतु, डॉक्टरांना त्यांचे प्राण वाचविण्यात अपयश आलं.वांद्रे येथे घडलेल्या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. यात पोलिसांनी दोघां हल्लेखोरांना अटक केली असली तरी एक आरोपी फरार आहे.

तर जीशान सिद्दीकीचाही झाला असता गेम

जीशान सिद्दीकी हा देखील मारेकऱ्यांच्या टार्गेट होता अशी माहिती पुढे येत आहे. त्या रात्री जीशान सिद्दीकी हा वडिलांसोबत घरी जाणार होता. मात्र, त्यास एक फोन कॉल आल्याने जीशान सिद्दीकी हा कार्यलयातच थांबला व बाबा सिद्दीकी हे कार्यालयातून एकटेच बाहेर पडले. यामुळे जीशान हा थोडक्यात बचावला. जीशान सिद्दीकी व बाबा सिद्दीकी दोघेही घरी जाण्यासाठी एकत्र गेली असती तर जीशान सिद्दीकी याला देखील आपला जीव गमवावा लागला असता असे स्पष्ट होत आहे.

या हल्ल्यातील दोघां हल्लेखोरांना पोलिसांनी लागलीच अटक केली. या दोघांपैकी एक उत्तर प्रदेशचा तर दुसरा हरियाणाचा रहिवाशी आहे. दरम्यान, याप्रकरणी तिसऱ्या आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत. पोलीस या प्रकरणाचा तिघं बाजूने तपास करत आहेत. यातील पहिली बाजू हि एसआरए प्रकल्प असून हा झोपडपट्ट्या ओळखण्याचा आणि झोपडपट्टी पुनर्विकासाची कामे हाती घेणारा प्रकल्प आहे. वांद्रे येथे विकसित होत असलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या (एसआरए) प्रकल्पात बाबा सिद्दीकी यांनी पिरॅमिड डेव्हलपर्सना मदत केल्याचा आरोप होता. तसेच, हा दोन हजार कोटींचा घोटाळा असल्याचे बोललं जात आहे.

या प्रकरणात अजून एक दुसरी बाजू समोर येत आहे. यात बिश्नोई गँगशी असलेली दुसरी बाजू उघड होत आहे. बाबा सिद्दीकी यांची अभिनेता सलमान खान सोबत जवळीक होती. तसेच, गुन्हे शाखेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासादरम्यान आरोपींचा बिष्णोई टोळीशी संबंध असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मागील एक महिन्यापासून  हल्लेखोर घटनास्थळाचा रेकी करत असल्याचे सूत्रांचे स्पष्ट केले आहे. यासोबतच बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणात राजकीय वैमनस्यची बाजूही समोर येत आहे.