तरुण भारत लाईव्ह । १८ जानेवारी २०२३। भुसावळच्या जंक्शन रेल्वे स्थानकावर ईएमआर (इर्मजन्सी मेडीकल रूम) चा शुभारंभ मंगळवारी दुपारी चार वाजता डीआरएम एस.एस.केडिया यांच्याहस्ते करण्यात आला. भुसावळ विभागात सर्वप्रथम शहरात ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून आगामी काळात विभागातील सहा रेल्वे स्थानकावर ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. रेल्वे प्रवासात एखाद्या प्रवाशाची प्रकृती खालावल्यास वा बिघडल्यास तसेच रेल्वे स्थानकावर प्रवाशाची प्रकृती बिघडल्यास त्यांच्यावर तातडीने उपचार करणे आता सुलभ होणार असून 24 तास वैद्यकीय सेवा उपलब्ध राहणार आहे.
मुसाफीन खान्यातच दवाखाना
सिनीयर डीसीएम डॉ.शिवराज मानसपुरे, रेल्वे सुरक्षा बलाचे सहआयुक्त बी.पी.कुशवाह, रेल्वे हॉस्पीटलचे वैद्यकीय अधिकारी, स्टेशन प्रबंधक मनोज श्रीवास्तव यांच्यासह रेल्वेच्या विविध विभागाचे अधिकारी कार्यक्रमास उपस्थित होते. रेल्वे स्थानकावर ईएमआर संकल्पनेतून रेल्वे स्थानकाच्या प्रमुख प्रवेशद्वाराकडे मुसाफिर खान्यात 500 स्वेअर फुट जागेत हा दवाखाना सुरू करण्यात आला आहे.
आगामी काळात सहा रेल्वे स्थानकावर सुविधा
भुसावळ विभागातील बडनेरा, अकोला, जळगाव, खंडवा, मनमाड आणि नाशिक या रेल्वे स्थानकांचा पहिल्या टप्यात समावेश असून या रेल्वे स्थानकावरील निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली असून सर्वात आधी भुसावळ रेल्वे स्थानकावर हा दवाखाना सुरू करण्यात आला आहे.
नाममात्र शुल्कात मिळणार सुविधा
वरीष्ठ वाणिज्य प्रबंधक शिवराज मानसपुरे म्हणाले की, वैद्यकीय सेवेसाठी अत्यंत नाममात्र सेवा शुल्क आकारले जाणार आहे. रेल्वे प्रवासात अथवा रेल्वे स्थानकावर एखाद्या प्रवाशाला काही त्रास झाल्यास तेथे जावून वैद्यकीय पथक तपासणी करणार आहे शिवाय रेल्वेतील तिकीट निरीक्षक अथवा आरपीएफला माहिती दिल्यास उपचार तातडीने उपलब्ध होईल.
प्रवाशांसाठी मोठी उपलब्धी
देशभराच्या कानाकोपर्यातून धावणार्या अनेक रेल्वे गाड्यांना भुसावळ रेल्वे स्थानकावर थांबा आहे मात्र प्रवासाच्या कालावधीत एखाद्या प्रवाशाची प्रकृती खालावल्यानंतर त्यांच्यावर उपचार करण्यासाठी मोठी अडचण येते. मात्र आता रेल्वे स्थानकावरही 24 तास वैद्यकीय सेवा उपलब्ध झाल्याने रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. तीन सत्रात डॉक्टर उपलब्ध असतील त्यासाठी रेल्वे बोर्डाने ठरलेल्या दरानुसार आकारणी करण्यात येणार आहे.