---Advertisement---
तुम्ही विमानात प्रवास करताना अनेकदा एअर ‘होस्टेस’ बघितल्या असतील. आता याच धर्तीवर बस प्रवासातही ‘होस्टेस’ची (शिवनेरी सुंदरी) सुविधा अनुभवता येणार आहे. याबाबत एसटी महामंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष भरत गोगावले यांनी नुकत्याच झालेल्या बैठकीत घोषणा केली. ‘शिवनेरी सुंदरी’ ही सेवा लवकरच सुरु होणार असून, या सेवेदरम्यान प्रवाशांना प्रवासाचा एक वेगळाच अनुभव घेता येणार आहे. चला मग जाणून घेऊयात ही सेवा कुठे सुरु होणार आहेत.
एसटी महामंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष भरत गोगावले यांच्या अध्यक्षतेखाली ३०४वी संचालक मंडळाची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीमध्ये विविध खात्यांच्या तब्बल ७० पेक्षा जास्त विषयांवर चर्चा होऊन त्यांना मान्यता देण्यात आली. यात ई-शिवनेरी बसमध्ये प्रवाशांना मदत करण्यासाठी ‘शिवनेरी सुंदरी’ नेमण्यास मान्यता देण्यात आली आहे.
कुठे होणार सुरुवात ?
हवाई ‘सुंदरी’च्या धर्तीवर आता एसटी महामंडळाच्या ई-शिवनेरी बसमध्ये ‘शिवनेरी सुंदरी’ असणार आहे. मुंबई-पुणे मार्गावर धावणार्या ई-शिवनेरी बसमध्ये प्रवाशांच्या मदतीसाठी या ‘शिवनेरी सुंदरी’ची नेमणूक करण्यात येणार आहे.
भविष्यात अभिनव योजना – भरत गोगावले
आनंदाची बाब म्हणजे, प्रवाशांच्या तिकिटावर कोणताही अधिभार न लावता चांगल्या सेवा सुविधा देऊन गुणात्मक सेवेचा दर्जा उंचावेल अशी अभिनव योजना भविष्यात सुरू करण्यात येणार आहे, असे भरत गोगावले यांनी सांगितले.
चंद्रपुरात दोन नवे आगार
चंद्रपूर जिल्ह्यातील मूल आणि अमरावती जिल्ह्यातील धारणी या आदिवासीबहुल प्रदेशांमध्ये एसटीचे नवे आगार निर्माण करण्यात येणार आहेत. या आगारांच्या निर्मितीनंतर एसटीच्या एकूण आगारांची संख्या २५३ होणार आहे.
तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतील स्वर्गीय आनंद दिघे यांच्या स्मरणार्थ एसटीच्या ३४३ बस स्थानकांवर ‘आनंद आरोग्य केंद्र’ या नावाने दवाखाना सुरू करण्यात येणार आहे. या दवाखान्यात अत्यंत माफक दरामध्ये बस स्थानकांवरील प्रवाशांबरोबरच आसपासच्या सर्व नागरिकांना विविध आरोग्य चाचण्या व औषधे एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासाठी संबंधित संस्थांना बसस्थानकांवरील ४०० ते ५०० चौ.सेमी. एवढी जागा उपलब्ध करून देण्यात येईल. तेथे त्या संस्थेने आरोग्य तपासणी दवाखाना, पॅथॉलॉजी लॅब व औषध दुकान सुरू करून सेवा द्यायची आहे.
बस स्थानकांवर महिला बचत गटांना स्टॉलसाठी जागा
एसटी महामंडळाच्या प्रत्येक बस स्थानकांवर त्या परिसरातील महिला बचतगटांना आपले स्थानिक पदार्थ विक्री करण्यासाठी चक्रीय पद्धतीने नाममात्र भाडे आकारुन १० बाय १० आकाराचा स्टॉल उपलब्ध करून देण्यात येणार आहे.