तरुण भारत लाईव्ह न्युज जळगाव : जिल्ह्यात रावेर, यावल तालुक्यात केळी झाडांचे समाजकंटकांडून रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात कापून फेकली जात आहे. शेतकर्यांची घड लागलेली केळीची झाडे समाजकंटकांकडून लक्ष्य केले जात आहे. त्यात विशिष्ट संघटनेकडून यासाठी आर्थिक रक्कम देण्यात येऊन हिदू संघटनांच्या कार्यकर्त्यांच्या केळी बागा उध्दवस्त केल्या जात असल्याचा मुद्दा शेतकर्यांनी उपस्थित केला. याविषयी भारतीय किसान संघटनेने जिल्हाधिकार्यांची भेट घेत आंदोलन करून लक्ष वेधले.
शेतकर्यांसह भारतीय किसान संघटनेचे पदाधिकारी यांची खा.रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. त्यात भारतीय किसान संघ व शेतकर्यांनी याविषयी विविध प्रश्न उपस्थित केले. यासंदर्भात सखोल चौकशी होऊन केळीचे उभे खोड कापण्यासाठी आर्थिक रसद पुरविणार्या संघटनेचा शोध घेऊन पोलिसांनी कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी शेतकर्यांनी केली. त्यासंदर्भात जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी चौकशी करून शेतकर्यांच्या केळीचे नुकसान करणार्यांवर कठोर कारवाई करण्याची सूचना केली. तसेच शेतकर्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन दिले. पोलीस अधीक्षक एस.राजकुमार यांनीही या परिसरात ग्रामरक्षक दल स्थापना करण्यात येईल. तसेच अशा गुन्हेगारांवर करडी नजर ठेवण्यात येऊन त्यांचा लवकरच शोध घेण्यात येईल, असे शेतकर्यांना आश्वासित केले.