तरुणभारत लाईव्ह न्युज : चाळीसगांव तालुक्यातील मेहुणबारे येथील एकाचा धारदार शस्त्राने भोसकून एकाचा खून झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान, बहिणीने प्रेमविवाह केल्याच्या संशयातून भावाने हा खून केल्याची माहिती समोर आली आहे. वामन खैरनार (गढरी) (५२) रा. ४ गल्ली पाण्याच्या टाकीजवळ मेहुणबारे ह.मु. तिरपोळे) असे मयत व्यक्तीचे नाव आहे.
यासंदर्भात दीपक दगा गढरी (४५) धंदा नोकरी रा. गढरी गल्ली, जुनेगाव मेहुणबारे, ता. चाळीसगाव) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीत गढरी यांनी म्हटले आहे की, त्यांचे मावसा वामन खैरनार (गढरी) हे त्यांच्या पत्नी लताबाई सोबत राहतात व शेतमजुरी करतात. त्यांना एक मुलगा जगदीश व एक मुलगी आहे. सुमारे ३ महिन्यांपूर्वी मावसभाऊ जगदीश याने ते यापूर्वी राहत असलेल्या मेहुणबारे गावात घराच्या मागील बाजुस राहणारी अश्विनी राजेंद्र चव्हाण हिच्यासोबत प्रेमविवाह केल्याचे समजले. याचाच राग अश्विनी हिच्या परिवाराला होता. या प्रेमप्रकरणावरुन दोघं परिवारामध्ये वादविवाद होऊन भांडण झाले होते. तसेच ते अधूनमधून दगडू खैरनार यांच्यासह नातेवाईकांना दमबाजी करीत होते.
आज १६ डिसेंबर रोजी सुमारे दुपारी १ वाजेच्या सुमारास दगडू वामन खैरनार (गढरी) हे तिरपोळे येथून मेहणबारे येथे धुळे रोडवरील हायस्कूलसमोर असलेल्या रेशन दुकानातून रेशन घेऊन बसस्टॅडकडे पायी जात होते.
यावेळी धुळे रोडवरील दादा कोळी यांच्या घरासमोर प्रेमप्रकरणाचा राग धरून अश्विनीचा भाऊ सचिन राजेद्र चव्हाण याने मोटार सायकलवर येवून त्याच्या हातातील धारधार हत्यार (धार्याने) दगडू खैरनार (गढरी) यांच्या मानेवर मागील बाजूने वार केल्याने ते जागीच मयत झाले. दरम्यान, संशयित आरोपीच्या शोधार्थ स्थानिक पोलिसांसह एलसीबीचे पथक वेगवेगळ्या ठिकाणी रवाना झाले आहे.