तरुण भारत लाईव्ह न्यूज शहादा : नंदुरबार जिल्हा आकांक्षित जिल्हा आहे. केंद्र सरकारचे या जिल्ह्याकडे विशेष लक्ष आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात केंद्राच्या अमृतसरोवर योजनेबरोबरच जलस्त्रोत पुनर्जिवित करण्याच्या कार्यक्रमास भारतीय जैन संघटना जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली कोणतीही आर्थिक मदत न घेता, शासनाच्या खांद्याला खांदा लाऊन मदत करण्याचा सामंजस्य करार जिल्हाधिकारी कार्यालयात झाला. जिल्हाधिकारी मनीषा खत्री व भारतीय जैन संघटनेचे जिल्हाप्रमुख डॉ. कांतीलाल टाटिया यांनी करारावर सह्या केल्या.
याप्रसंगी भारतीय जैन संघटनेतर्फे नंदुरबारचे नरेश कांकरिया, सतीश जैन व नवापूरचे ईश्र्वर टाटिया उपस्थित होते. याआधी भारतीय जैन संघटनेने सन 17-18 साली जिल्ह्यातील 52 गावात प्रामुख्याने नंदुरबार व शहादा तालुक्यात 44 जेसीबी व 19 पोकलंड 20 हजार तास चालवून 2 कोटी 12 लाख लीटर पाणी साठवण क्षमता उपलब्ध करून दिली होती. जलस्त्रोत पुनर्जिवित करण्याच्या कार्यक्रमात जनसामान्यांचा सहभाग अतिशय महत्वाचा असतो. हा पूर्वानुभव भारतीय जैन संघटनेच्या गाठीशी आहे. जलस्त्रेत पुनर्जिवित करण्यासाठी समुदायाचे एकत्रिकरण, शेतकर्यांच्या वर्तनातील बदल, त्यांची वापर क्षमता वाढविण्यासाठी प्रबोधन, गाळ काढणे व उत्खनन करणे, गाळ शेतात टाकण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ठरविलेल्या पध्दतीचा अंगीकार करत या सर्व प्रक्रियेत ग्रामपंचायत प्रशासनालाही सहभागी करण्याचे उद्दिष्ट आहे. आपल्या परिसरातील जलस्त्रोतांचा गाळ काढण्याबाबत ग्रामस्थांची मागणी आवश्यक रहाणार आहे. मंजुरी प्रक्रिया जिल्हा प्रशासन करणार आहे. प्रशासन या कार्यक्रमासाठी एक ’नोडल’ अधिकारी नियुक्त करेल.
सामंजस्य कराराप्रमाणे भारतीय जैन संघटना जलस्त्रोताचे अभ्यासपूर्ण मार्गदर्शन करत या कार्यक्रमाला चळवळीचे स्वरुप देणे, योग्य स्त्रोतांची निवड करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला सहाय्य करेल, नोडल अधिकारी सर्व संबंधितांशी सल्लामसलत करून जलसाठा पुनर्जिवित करण्यासाठी प्रमाणित करतील अशा ठिकाणी अपेक्षित निधी व यंत्र सामुग्री उपलब्ध झाल्यावर कार्यारंभ करणे, होत असलेल्या कामाकडे सूक्ष्म लक्ष देणे व प्रशासनास सर्वतोपरी सहकार्य करणे, जलजीवन मिशनच्या अन्य योजनांचाही त्यांच्या यशस्वीतेसाठी प्रचार व प्रसार करणे इ. कार्य करणार आहे.
जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी विश्र्वास दाखवला म्हणून भारतीय जैन संघटनेच्या पदाधिकार्यांनी त्यांचे आभार मानलेे. जानेवारीनंतर कार्यक्रमाचे नियोजन करण्याचे यावेळी ठरविण्यात आले.