जुलै 1930 मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार हे पुसद येथे गेले असताना त्यांना असे दिसले की, एक कसाई एका गाईला ओढत कत्तलखान्यामध्ये घेऊन जाण्यासाठी जात होता. गाय जायला तयार नव्हती त्यामुळे तो तिला फटके मारत ओढत घेऊन जात होता. डॉ. हेडगेवार यांनी हे दृश्य पाहिले. त्यांना खूप राग आला. ते त्या कसायाकडे गेले व त्यांनी त्याच्या तावडीतून गाईची मुक्तता केली. डॉ. हेडगेवार संघाचे संस्थापक होते. त्यांच्या प्रेरणेतून जो संघ सुरू झाला त्या संघाचे लाखो स्वयंसेवक आज देशभरामध्ये गोरक्षेचे कार्य करीत आहेत. ज्या ठिकाणी डॉक्टरांनी त्या गाईला कसायाच्या तावडीतून मुक्त केले त्याच ठिकाणी नुकताच गोरक्षकांचा सत्कार करण्यात आला.
या गोष्टीला 93 वर्षे पूर्ण झाली आहेत तरी आजही कसाई शेतकर्यांकडील गाई विकत घेतात व त्यांना कत्तलखान्यामध्ये घेऊन जातात. त्याकाळी स्वत: डॉ. हेडगेवार यांनी गोरक्षा करून गोरक्षेचे महत्त्व लोकांना पटवून दिले होते. तेच कार्य आज संघापासून प्रेरणा घेतलेले लाखो कार्यकर्ते व संघटना करीत आहेत. गोंदवलेकर महाराज हेसुद्धा त्यांच्या प्रवासामध्ये असताना त्यांना बाजारामध्ये कसाई गाईला विकत घेऊन मारत मारत घेऊन जात आहे, असे दिसले. ती गाय त्या कसायासोबत जाण्यासाठी तयार नव्हती. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. हे दृश्य गोंदवलेकर महाराज यांनी पाहिले व त्यांनी त्या कसायला थांबवले. त्याला त्या गाईचे मूल्य विचारले व भरपूर मूल्य देऊन त्यांनी ती गाय विकत घेतली व त्या गाईचे प्राण वाचविले. त्यांच्या जीवनामध्ये अनेक वेळा त्यांनी बाजारामध्ये उभ्या असलेल्या गाईंना कसायाच्या तावडीतून वाचविले होते. यावरून साधू-संतांनी आपल्याला गोरक्षेचा संदेश दिलेला आहे, हे आपल्या लक्षात येते. गजानन महाराजांच्या चरित्रामध्ये ज्या वेळेला काही लोक एका गाईला तिचे चारही पाय साखळदंडांनी बांधून आणतात त्यावेळेला गाईची अवस्था पाहून गजानन महाराज कळवळतात. ते म्हणतात की, ‘अरे ही गाय म्हणजे अवघ्या जगाची माय आहे.’ अनेक ठिकाणी या गोरक्षकांवर कसायांद्वारे हल्ले चढविण्यात येतात. नुकताच एका गोरक्षकाचा अशा हल्ल्यामध्ये मृत्यू झाला. गाय ही हिंदू समाजाकरिता अतिशय पूजनीय आहे. पवित्र आहे. हे माहीत असतानाही केवळ हिंदूंच्या भावना दुखवण्यासाठी अनेक ठिकाणी गो-हत्या केली जाते.
मोठमोठ्या ट्रक-मेटॅडोरमधून मालवाहतुकीसारखी गाईंची वाहतूक केली जाते. त्यांना दाटीवाटीने कोंबून त्या वाहनांत कोणालाही दिसणार नाही, अशा पद्धतीने भरले जाते. पूर्वीच्या काळी कत्तल करणारे आपल्या हातांनी कत्तल करायचे, परंतु आता तर मोठमोठे यांत्रिक कत्तलखाने निर्माण झालेले आहेत. जेथे गाईला यंत्राने बांधले जाते व तिला उचलले जाते. काही अंतर समोर गेल्यावर एका ठिकाणी थांबवून तिच्या मानेवर वार केला जातो. त्यामुळे मान अर्धवट कापली जाते व त्यातून रक्त बाहेर पडणे सुरू होते. खालच्या ट्रे मध्ये गाईचे हे रक्त जमा होत असते. आणखी पुढे गेल्यावर तिच्या अंगावरची सर्व चामडी सोलली जाते. आणखी पुढे गेल्यावर तिचे एक एक अवयव यांत्रिक पद्धतीने कापले जातात. हे सर्व होतपर्यंत त्या गाईला मृत्यू आलेला नसतो. ती गाय जिवंत असते व तडफडत असते. यांत्रिक कत्तलखान्यामध्ये गाईची अमानुषपणे हत्या केली जाते. हे सर्व त्याच देशांमध्ये घडत आहे जेथे करोडो लोकांचा हिंदू समाज गाईला पूजनीय मानतो. खाण्यासाठी अनेक प्रकारांच्या प्राण्यांचे मांस उपलब्ध असताना केवळ हिंदूंच्या भावना दुखावण्यासाठी गोमांस विकले व खाल्ले जाते. प्राचीन काळापासून गाईला गोधन, असे म्हटलेले आहे. आमचा देश हा कृषी संस्कृतीचा देश आहे.
गाय ही शेतीकरिता बैल देते. गाईच्या अमृततुल्य दुधावर मानवाच्या कित्येक पिढ्या पोसल्या गेलेल्या आहेत.गाईचे मलमूत्र शेतामध्ये खत म्हणून वापरले जाते. परंतु, मागच्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर गोहत्या झालेली आहे. देशी वंशाच्या गाई नष्ट झालेल्या आहेत. गाय आणि डुकराच्या संकरापासून निर्माण झालेला प्राणी म्हणजे जर्सी आहे. तो दूध जरी देत असला, तरीही त्याला गाय मानू नये. आपल्या शास्त्रामध्ये गाईचे जे वर्णन सांगितलेले आहे त्यामध्ये असे म्हटले आहे की, जिला शिंग आहे, जिच्या खांद्यावर खोंड आहे, जिच्या गळ्याला पोळी आहे तिला गाय असे म्हटले जावे. परंतु, विदेशामध्ये अनेकांनी प्राण्यांच्या संकरातून तयार झालेल्या विदेशी जाती भारतामध्ये रूढ करण्याचा प्रयत्न केला. हाच प्रयत्न अनेक सरकारांनी, सरकारी विभागांनी केला. त्यामुळे भरमसाट दूध मिळाले पाहिजे यासाठी विदेशी वंशाच्या गाई भारतात आल्या व लोक त्यांचे दूध पिऊ लागले. परंतु, ब्राझीलसारख्या देशाने भारतातून काही वर्षांपूर्वी तीन हजार गीर गाई विकत घेतल्या. त्यांच्यावर योग्य ती प्रक्रिया करून त्यांच्यापासून अधिक गीर प्रजातीच्या गाई तयार केल्या. म्हणजे विदेशामध्ये भारतीय वंशाच्या गाईंना किंमत आहे. विदेशी लोक भारतीय वंशाच्या गाईंना आपल्या देशात घेऊन चाललेले आहेत आणि आपल्या देशात मात्र देशी गाई कत्तलखान्यामध्ये कापल्या जात आहेत. पांडव अज्ञातवासात होते. त्यांना बाहेर काढण्यासाठी कौरवांनी विराट राज्याच्या गाई पळविल्या व त्या हजारो गाईंना हाकत ते घेऊन चालले होते. गायींचा हा अपमान पांडवांना सहन झाला नाही. आपण अज्ञातवासात आहोत; जर आपण ओळखले गेलो तर आपल्याला पुन्हा अज्ञातवासात जावे लागेल, हे माहीत असतानासुद्धा ते गाईंच्या रक्षणासाठी शस्त्र घेऊन बाहेर युद्धासाठी प्रकट झाले.
आपल्या देशाचा इतिहास हा गोरक्षेचा इतिहास आहे. महाराष्ट्रामध्ये गोहत्या बंदीचा कायदा आहे. असे असताना गोधनाची सर्रास विक्री व कत्तल सुरू आहे. ठिकठिकाणी बजरंग दल, विश्व हिंदू परिषदचे कार्यकर्ते व अनेक गोरक्षक या गाईंना अडविण्याचे व मुक्त करण्याचे कार्य करीत असतात. त्यांच्यावर कसायांद्वारे हल्ले तर होतातच; परंतु पोलिस कसायांवर गुन्हे दाखल करण्याऐवजी गोरक्षकांवर गुन्हे दाखल करतात. अशा पद्धतीच्या घटना सध्या घडत आहेत. गाईचे दूध व तूप खाऊनच आमच्या देशातील लोक दीर्घायुषी झाले. अत्यंत बुद्धिमान झाले. अशा यागोमातेचे रक्षण करण्याचे कार्य आपल्याला करायचे आहे. यासाठी शासन, प्रशासन व जनता यांनी गोरक्षेच्या कार्यासाठी आपले लक्ष घालणे आवश्यक आहे.
(लेखक प्रसिद्ध वक्ते, सामाजिक व राजकीय विचारक आहेत.)
– अमोल पुसदकर
– 9552535813