भुसावळ ः सोयाबीन रीफाईंड ऑईलचा टँकर नागपूरकडे निघाल्यानंतर फेकरी टोल नाक्याजवळ शुक्रवार, 16 जून 2023 रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास चारचाकी वाहन चालकाला वाचवण्याच्या प्रयत्नात उलटला होता. या अपघातात त्यावेळी वाहतूक संपूर्ण ऑईल वाहून गेल्याने तसेच नागरीकांनी वाहनाच्या टँकरमधील ऑईल लांबवल्याने सुमारे 39 लाखांचे नुकसान झाले होते.
याप्रकरणी तब्बल दोन महिन्यानंतर भुसावळ तालुका पोलिसात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुजरातच्या हजरा येथून नागपूरकडे टँकर (जी.जे.12 बी.एक्स.9325) मधून सोयाबीन रीफाईंड ऑईल घेवून चालक दुर्गाराम गोगाराम जाट (47, खडीन, रामनगर, बाडमेर, राजस्थान) हा नागपूरच्या दिशेने निघाला होता मात्र जुन्या फेकरी टोल नाक्याजवळ चारचाकी वाहन समोर आल्याने चालकाने अपघात टाळण्याच्या प्रयत्नात टँकर कडेला घेतला मात्र यावेळी टँकर उलटल्याने त्यातून तेलाची गळती सुरू झाली. नागरीकांनी मिळेल त्या साधनांनी तेल लांबवले तर मोठ्या प्रमाणावर सोयाबीन ऑईल वाहून गेले होते. अपघातप्रकरणी तब्बल दोन महिन्यानंतर चालक जाट यांच्या तक्रारीवरून 38 लाख 81 हजार 588 रुपयांचे सोयाबीन तेल चोरून नेल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक निरीक्षक अमोल पवार करीत आहेत.