मन कावरे बावरे
जणू डोंगराची काया,
चढ उताराची वाट
पाऊल निघाले शोधाया,
जीवनातील पाऊलवाट एका वादळाप्रमाणे असते. अचानक वादळ आल्यावर त्या पाऊलवाटेतील सर्व पाऊले पुसली जातात. माणसाचं जीवनही असंच असतं. अथक परिश्रमाने सुंदर घरटं माणूस साकारतो, त्यास कष्टाने उभे करतो. भविष्यातील आशावादी दृष्टिकोन त्याच्या नजरेसमोर असतो. एक अपेक्षेने, एक प्रेरणेने, आपल्या पिलांसाठी, त्यांच्या भावी आयुष्यासाठी…
आपण जे दुःख कष्ट भोगले ते आपल्या पिलांच्या वाटेला यायला नको हीच त्यांची अपेक्षा. म्हणून हे वटवृक्ष आपल्या पारंब्याना मजबूत बनवत असतं. या पाखरांना सांभाळून काळजी घेऊन, जीवापाड जपून त्यांना सक्षम बनवितो. निसर्ग नियमाप्रमाणे पाखरे मोठी होतात व स्वतःच्या पंखानी उंच भरारी घेण्यासाठी मुक्तसंचार करतात. पण हीच पाखरं उंच भरारी घेऊन इतक्या उंच जातात ती पुन्हा घरट्यात परत न येण्यासाठी अन् येथेच माणूसपण हरते, अपेक्षा संपतात, उरतो तो फक्त एकाकीपणा…
काव्यसंमेलनानिमित्त नुकताच वृद्धाश्रमात जाण्याचा प्रसंग आला. तेथे गेल्यावर कळाले की, माणसाचे खरे अस्तित्व काय आहे, त्याची भूमिका काय आहे, जीवनाच्या या प्रवाहात वेदना, नकार, तिरस्कार, अवहेलना, हाल-अपेष्टा या सार्यातून एक भयानक कथानकच ऐकावयास मिळाले ते त्या वृद्ध थकलेल्या, अनुभवाच्या ज्वालातून तापून निघालेल्या त्या आशावादी नजरेचे… वृक्षाच्या वेदना त्या वृक्षालाच माहीत असतात तो कुठेही त्याची वाच्यता करीत नाही. अगदी असेच अनुभवयास मिळाले.
बाळ रडते तेव्हा सार्यांनाच समजते, पण आईवडील रडतात तेव्हा चार भिंतींनाही ते ऐकू येत नाही. मनुष्यरूपी वृक्षांचा हा वेदनादायी प्रवास खरोखर थक्क करणारा, विचार करायला लावणाराच वाटला. आईवडील काबाडकष्ट करून मुलांच्या भविष्यासाठी स्वतःला विकून देतात. कर्जाचा डोंगर बाप शिरावर घेतो. स्वतः उपाशीपोटी राहून माय लेकराला घास भरवते. अशा आशावादी नजरेतून ते आपली जीवननौका पार करीत असतात. पण अपेक्षाभंग, भ्रमनिरास झाल्यावर कळते की आपण ज्यांच्यासाठी हे सर्व केले ती पाखरे तर कधीच उडून गेली या पडक्या भिंतींना एकाकी करून…
या वेदनादायी प्रवासात काहींना आपल्यानीच लाथाडले, काहींना आपल्यानीच ओरबाडले, तर काहींना रक्तानेच रक्तबंबाळ केले. सर्वांचा प्रवास वेदनादायी पण, मार्ग वेगवेगळा.
क्षणात नाते विसरून
छळत गेली माणसे…
नात्यांपासून नात्यांना
तोडत गेली माणसे…
जग झपाट्याने बदलत आहे, तसा माणूसही… धन-दौलत, गाडी, बंगला नोकर-चाकर, बँक बॅलन्स, प्रॉपर्टी यांच्या मागे धावताना माणूस कुठेतरी माणुसकीचे नाते विसरला. श्रावणबाळाने आपल्या आई वडिलांना कावडमध्ये बसवून चारधामची यात्रा घडवली. गणपती बाप्पाने आपल्या आई-वडिलांना तीर्थक्षेत्र मानून प्रदक्षिणा घातल्या, असे आपण ज्येेष्ठांच्या तोंडून ऐकलेच आहे.
साने गुरुजींनी ‘श्यामच्या आई’मधून आई-वडिलांनी केलेले संस्कार जगासमोर आणले. साने गुरुजी नेहमी म्हणत, माझे जे काही आहे, ते माझ्या आईचे देणं आहे. परंतु आजच्या या धकाधकीच्या जीवनात असंख्य आईंचा श्याम मात्र हरवलेला दिसला.
वंशाला दिवा मुलगा हवा म्हणून आईवडील परमेश्वराकडे नवस, उपासतापास, पूजाअर्चा करतात, बाळाला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपतात, असं म्हणतात, बाळ रडतं तेव्हा मायचं काळीज रडत असतं. आईचे अश्रू दिसतात, पण बापाचे श्रमाचे अश्रू दिसत नाही अन् हेच आतून ओघळणारे अश्रू मी पाहिले, अनुभवले. ज्यावेळी मी या आजी-आजोबापर्यंत पोहोचलो, त्यावेळी त्यांनी आपुलकीने जवळ घेतले, प्रेमळ हात डोक्यावर फिरवला. खरोखर हा प्रसंग अविस्मरणीय वाटला. मी त्यांचा एक मुलगा म्हणून बोलते केल्यावर असे लक्षात आले की, कुणाला वृद्ध आईवडील घरात नको, कुणाला प्रॉपर्टीत अडसर नको, कुणाला सासू-सासरे नकोत. मॉडर्न दुनियेत वृद्ध ही संकल्पनाच नको हेच कळाले. वृद्धांचा हा त्याग मुलांकडून, सुनेकडून, भावाकडून, नात्याकडून झालेला होता. पुढे घरात वृद्ध व्यक्ती असली की संस्कार त्या पिढीवर होत असे. पण आजच्या पिढीला कुठलीच वृद्धांची कटकट नको आजच्या फास्ट युगात पती-पत्नी मुलं हे समीकरण झालंय. कारण त्यांना त्यांच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा नकोय.
आयुष्य इंटरनेट झालंय पण माणूस माणसापासून दुरावला. सारे सगे सोयरे तो मोबाईलच्या डब्याला मानतो. सुख, दुःख, विरंगुळा, खेळ तो यातूनच अनुभवतो. मग अशांना वृद्ध मातापित्यांचा अडसर वाटणारच,, आज मात्र हेच वृद्ध वृद्धाश्रमालाच घर समजतात हे मी बघितलं. या वृद्धाश्रमातील इतर वृद्धांनाच ते सगे- सोयरे समजतात. तरीही त्यांच्या चेहर्यावरील काळजी, चिंतायुक्त प्रवास टिपल्याशिवाय राहवला जात नाही.
या दुःखद प्रवासातदेखील त्यांना आपल्या बाळाची चिंता वाटते हे विशेष. तो सुखी राहो, हेच त्यांच्या तोंडून उदगार… खरंच ग्रेट असतात आईवडील. पण हे समजण्यासाठी बापाच्या भूमिकेतून जावं लागतं. पश्चातापाची वेळ यायच्या आत सावरलं पाहिजे. आज ह्या काठीला आधार हवा, प्रेमाचे शब्द हवेत, परंतु माणुसकीच्या नात्याच्या या भिंतीला आता तडे जाऊ लागले आहेत.
या वृद्ध थकलेल्या वाटसरूना भेटून आपोआप नात्यांच्या या दोरखंडाबाबत खूप प्रश्न मनात उठायला लागले. ते म्हणतात, आता हीच आमुची पंढरी, येथेच आमची चंद्रभागा, कुणाचा बारा तर कुणाचा चौदा वर्षाचा हा प्रवास थक्क करणारा वाटला. या प्रवासात त्यांची नाती त्यांना भेटू नये ही खंत वाटली. अशा या मायावी दुनियेतील वाढती वृद्धाश्रमाची संख्या पाहून जाणवते की, वृद्धांची किती अवहेलना होत असावी. किती कष्टमय प्रवासातून ही वयस्क चालली आहेत, हे पाहून मानवी मनाला वेदना झाल्याशिवाय राहत नाही.
सोस माझ्या जिवारे,,
सोसल्याचा सूर होतो,,,
सूर साधी ताल जेव्हा,
भार त्याचा दूर होतो..
या ओळीप्रमाणे आज हे वयस्क आजी-आजोबा परमेश्वराच्या वाटेकडे जायची प्रतीक्षा करताना दिसले. तरीही आपुल्या पिलांसाठी शुभचिंतूनच हे वृक्ष कोसळायचे म्हणतात…
दिनेश चव्हाण
९४२१५१६३८९