शहरात मुख्य रस्त्यांवर वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर ; स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष, वाहतूक पोलीस लक्ष देईना

जळगाव : शहरात प्राथमिक तसेच माध्यमिक शाळा महाविद्यालयांच्या प्रवेशव्दारासमोर शाळा भरण्याच्या वा सुटण्याच्या वेळेस मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. तसेच विविध चौक किंवा मुख्य रस्त्यांच्या कडेला फूटपाथलगत लहान मोठया व्यावसायिका, दुकानापुढे पार्कीगमुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असल्याचे चित्र आहे .याचा फायदा घेत अनेक भुरटे चोर रस्त्यावरून जाणार्‍या पादचार्‍यांचे महागडे मोबाईल हातोहात लांबवत असल्याचा घटना उघडकीस येत आहेत. परंतु स्थानिक प्रशासनासह पोलीस प्रशासनाचे याकडे सोयीस्कररित्या दूर्लक्ष होत आहे.
शहरात टॉवर चौक परिसरात केळकर मार्केटजवळ शिवाजीनगर परिसराला जोडणारा रेल्वे उड्डाणपूल गेल्या दिड दोन महिन्यापासून रहदारीसाठी खुला करण्यात आला आहे. परंतु या पुलाच्या खालील बाजूस दुतर्फा समांतर रस्त्यांचे काम अपूर्ण आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणावर लहान मोठी व्यावसायिक दुकाने आहेत. या दुकानांच्या पुढेच अनेक वाहने रस्त्यातच लावलेली आढळून येतात. तसेच अ‍ॅटोचालक देखील प्रवासी घेण्याच्या उद्देशाने वाटेल तेथे अ‍ॅटो उभी करतात.

मनमानी अ‍ॅटो थांबे

नवे-जुने बस स्थानक, दाणा बाजार, पोलन पेठ, चित्रा चौक, नेहरू चौक, मनपा जवळील खाऊगल्ली तसेच रेल्वे स्थानक आदी परिसरात भेळपुरी, ऑम्लेट, साबुदाणा-वडा वा अन्य लहान मोठे व्यावसायिक खाद्यपदार्थांची दुकाने सायंकाळच्या वेळी आपली दुकाने थाटतात. नेहरू चौक परिसरात सायंकाळच्या वेळी एकापाठोपाठ अ‍ॅटो, बस चालक वा अन्य वाहन चालक एकापाठोपाठ वाहने दामटत असतात. त्यामुळे पादचार्‍यांना रस्ता ओलांडण्यासाठी किमान 10 ते 15 मिनिटे वाट पहावी लागते.

रेल्वे स्थानकात प्रवेश करणे दिव्यच

जळगाव जंक्शन स्थानकाबाहेर डॉ. आंबेडकर पुतळयाभोवती सायंकाळच्या वेळी चहा, केळी वेफर्ससह अन्य खाद्यपदार्थ विक्रेत्यांची दुकानांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. या परिसरात अ‍ॅटोरिक्षांसाठी स्वतंत्र पार्कीग व्यवस्था असूनही अनेक अ‍ॅटोचालक तसेच दुचाकी चालक रस्त्यातच वाहने उभी करताना दिसून येतात. त्यामुळे बर्‍याच वेळा रेल्वेस्थानकाकडे जाणारा मार्ग अवरूद्ध होउन आत जाणार्‍या प्रवाशांना अडथळ्यांचा सामना करावा लागतो. बरेचदा दुचाकी वा रिक्षांच्या बाजूलाच टवाळखोरांचा घोळका तसेच एकापाठोपाठा अनेक भिकारी देखील उभे असल्याने अनेक महिला प्रवाशांना रेल्वे स्थानकात वा फलाटावर जाणे एक प्रकारे दिव्यच असल्याचे दैनंदिन अपडाउन करणार्‍या प्रवाशांकडून बोलले जात आहे.