बंगळुरू : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेची बैठक येत्या २१, २२ आणि २३ मार्च रोजी बंगळुरू येथे जनसेवा विद्या केंद्र परिसरात होणार आहे. रा. स्व. संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी बुधवारी ही माहिती पत्रपरिषदेत दिली. प्रतिनिधी सभेचे उद्घाटन शुक्रवारी २१ रोजी सकाळी नऊ वाजता होईल. यावेळी मंचावर दक्षिण मध्य क्षेत्राचे (कर्नाटक, आंध्र आणि तेलंगणा) कार्यवाह एन. तिप्पेस्वामी तसेच अखिल भारतीय सह प्रचार प्रमुख नरेंद्र कुमार आणि प्रदीप जोशी उपस्थित होते.
सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत आणि सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे संयुक्तपणे प्रतिनिधी सभेचे उद्घाटन करतील. प्रतिनिधी सभेच्या प्रारंभी सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे संघकार्याच्या स्थितीवर वार्षिक विवेचन करणार असून, यानंतर विविध प्रांतातील कार्यकर्ता गतिविधी तसेच कार्यक्रमांचा अहवाल सादर करतील.
यंदा संघ स्थापनेला १०० वर्षे पूर्ण होत आहेत, यासाठी प्रतिनिधी सभेच्या बैठकीत संघकार्याच्या विस्तारावर विचारमंथन केले जाईल, विजयादशमी २०२५ ते विजयादशमी २०२६ दरम्यान शताब्दी वर्ष साजरे केले जाणार आहे. यासाठी व्यापक जनसंपर्क योजना तयार करण्यात आली असून, त्यात सर्व क्षेत्रांतील मान्यवरांना सहभागी केले जाणार आहे. सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन, पर्यावरण जागरूकता, स्वत्वावर जोर आणि नागरी कर्तव्य या पंच परिवर्तनांवरही चर्चा केली जाईल आणि शताब्दी वर्षादरम्यान समाजातील सर्व घटकांना सहभागी करण्याची योजना आखली जाणार आहे.
तीन दिवसीय अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत दोन प्रस्तावांवर चर्चा होणार आहे. पहिला प्रस्ताव बांगलादेशात हिंदू आणि अल्पसंख्पकांवर अत्याचाराची स्थिती तसेच भविष्यातील उपायांवर आहे. दुसरा प्रस्ताव मागील १०० वर्षांत संघाचा प्रवास, शताब्दी वर्षादरम्यान गतिविधी आणि भविष्यातील योजना याविषयी असेल. या प्रतिनिधी सभेत वीर योद्धा राणी अब्बक्ता यांच्या जन्मास ५०० वर्षे पूर्ण होण्याच्या अनुषंगाने एक विशेष वक्तव्य जारी होईल. राणी अब्बक्कांचा जन्म १५२५ मध्ये झाला होता आणि त्या कर्नाटकच्या राहणान्या होत्या. वक्तव्यात राणी अब्बक्कांच्या अद्वितीय योगदानाचे स्मरण होईल.
संघ प्रशिक्षण वर्गाविषयी माहिती देताना आंबेकर यांनी सांगितले की, यंदा रा. स्व. संघाच्या वतीने ९५ प्रशिक्षण वर्ग आयोजित केले जातील, ज्यात संघ शिक्षा वर्ग, कार्यकर्ता विकास वर्ग आणि आणखी एक कार्यकर्ता विकास वर्गाचा समावेश आहे. ४० वर्षपिक्षा कमी वयाच्या व्यक्तींसाठी ७२ वर्ग आयोजित केले जातील. तर २३ वर्ग ४० वर्षे आणि त्याहून जास्त वय असणाऱ्यांसाठी राहतील.
प्रतिनिधी सभेत माननीय सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या अखिल भारतीय प्रवासाच्या योजनांना अंतिम रूप दिले जाईल. चार वर्षांनंतर बंगळुरू येथे प्रतिनिधी सभेची बैठक आयोजित केली जात आहे.
या तीन दिवसीय बैठकीत ३२ संघ प्रेरित संघटनांचे अध्यक्ष, संघटन मंत्री आणि महामंत्री सहभागी होतील. अखिल भारतीय मजदूर संघाचे अध्यक्ष हिरणमय पंड्या, राष्ट्र सेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का, भाजपाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राजशरण शाही, विहिंपचे अध्यक्ष आलोक कुमार, वनवासी कल्याण आश्रमाचे सत्येंद्रसिंह, विद्या भारती आणि अन्य संघटनांचे प्रतिनिधी हजर राहतील. रविवारी २३ रोजी सकाळी ११.३० वाजता सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे पत्रपरिषदेला संबोधित करतील.