भुसावळातील दुभाजकावरील संतांचे पेंटिंग हटविले

नीलेश वाणी

तरुण भारत लाईव्ह न्युज –भुसावळ : शहरातील मुख्य रस्त्यावर दुभाजक टाकण्याचे काम बर्‍यापैकी झाले आहे. या दुभाजकाच्या सुशोभिकरणाचे काम गतीने सुरू आहे. शुक्रवारी जामनेर रोडवरील अहिल्यादेवी विद्यालयासमोर या दुभाजकावर संतांचे पेंटिंग्ज काढले जात असताना समाजसेवक प्रा. धीरज पाटील यांनी त्यावर आक्षेप घेत संतांच्या पेंटिंगची विटंबना होऊ नये म्हणून संतांचे पेंटिंग करू नये, अशी कठोर भूमिका घेतली. शेवटी दुभाजकावरील संतांचे पेंटिंग्ज हटविण्यात आले.

शहरातील लोखंडी पुलाच्या बोगद्यांचे सुशोभिकरण करण्यात येऊन समुद्री जलचर प्राण्यांची आणि स्पेस अर्थात अंतराळातील चित्रे बोगद्याच्या भिंतीवर काढण्यात आली. सुशोभिकरणाची हीच पुनरावृत्ती दुभाजकांसाठी वापरण्यात आली. शहरातील यावल रोड, जळगाव रोड येथे समाजात चांगला संदेश जाईल व प्रबोधन होईल, अशी चित्रे काढण्यात आली. जामनेर रोडवरील दुभाजकाचे सुशोभिकरण सुरू झाले आहे.

अहिल्यादेवी कन्या विद्यालयाजवळ दुभाजकांवर संत ज्ञानेश्र्वर, संत सोपान, संत निवृत्ती यांची प्रतिकात्मक चित्रे काढलेली होती. प्रा.धीरज पाटील यांना काही नागरिकांनी याबद्दल माहिती दिली व सोशल मीडियावरसुद्धा याबद्दल नाराजी व्यक्त होत होती. प्रा.पाटील यांनी तातडीने तेथे जाऊन संतांची चित्रे दुभाजकावर काढू नका, त्यांची विटंबना होऊ शकते आणि वारकरी संप्रदायाच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात. अप्रिय प्रसंग टाळण्यासाठी ही चित्रे काढून टाकावी, अशी सूचना त्यांनी केली. चित्र काढणार्‍या कलाकारांनी लागलीच ती चित्रे मिटविली. तेथे समुद्री जलचर प्राणी, अंतराळ, विद्यार्थ्यांची चित्रे रंगविण्यात आली.

दुभाजकावर गुटखा, पान तंबाखू व तत्सम पदार्थ खाऊन थुंकण्याचे प्रकार घडत असतात. अनेकदा दुभाजकावर पाय ठेवले जातात. वातावरणाने चित्रे काळी पडतात. समाजात संतांचे कार्य मोठे आणि प्रेरणा देणारे आहे. त्यांच्या चित्राची विटंबना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वारकरी संप्रदायावर प्रेम करणार्‍यांची भावना दुखू नये म्हणून खबरदारी घेणे आवश्यक आहे, प्रा.धीरज पाटील, समाजसेवक, भुसावळ