जळगाव : शहरातील सुनंदिनी पार्क येथे दिनेश भालेराव (४४) यांचे बंद घर फोडून चोरट्यांनी १ लाख ४१ हजार रुपये किमतींचा मुद्देमाल चोरून नेला. तर अमळनेरातील गोदावरी नगरातून निलेश ठाकरे (३२) यांचे बंद घर फोडून रोकडसह सोन्याचे दागिने चोरून नेले. या दोन्ही घटना रविवार, १६ जून रोजी घडल्या. या प्रकणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील सुनंदिनी पार्क येथे दिनेश भगवान भालेराव (४४) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. प्रिंटिंग प्रेसचे काम करून ते आपल्या उदरनिर्वाह करतात. १४ ते १६ जून पहाटे ४.३० वाजेच्या दरम्यान त्यांचे घर बंद होते. अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून, घरातील ५० हजार रुपयांची रोकड आणि सोन्याचे दागिने असा एकूण १ लाख ४१ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. हा प्रकार उघडकीला आल्यानंतर दिनेश भालेराव यांनी शनिपेठ पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास रंगनाथ धारबळे हे करीत आहे.
अमळनेर शहरातील गोदावरी नगरात निलेश शामराव ठाकरे (३२) हा तरुण आपला परिवारासह वास्तव्याला आहे. खाजगी नोकरी करून तो आपला उदरनिर्वाह करतो. शनिवार, १५ जून रोजी सायंकाळी ७ वाजता निलेश हा घर बंद करून कामावर निघून गेला. मध्यरात्री अज्ञात चोरट्याने बंद घर फोडून घरातून सोन्याची दागिने आणि १५ हजार रुपयांची रोकड असा एकूण ६५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना रविवार, १६ जून रोजी सकाळी ६ वाजता उघडकीला आली. याप्रकरणी अमळनेर पोलीसात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोहेकॉ विनोद सोनवणे हे करीत आहे.