जळगाव : शालेय जीवनात आणि एकूणच शिक्षण क्षेत्रात विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून विद्यार्थ्यांचा जीवन विकासाचा मार्ग समृद्ध करत वेदना आणि संवेदना समजून घेणाराच खरा शिक्षक असतो. हा शिक्षक विद्यार्थ्यांच्या भविष्यातल्या अनेक घडामोडी अनेक गोष्टी विद्यार्थी जीवनाला आकार देताना लक्षात घेत असतो, असे विचार कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रोफेसर विजय माहेश्वरी यांनी व्यक्त केले. ते सर्वोदय एज्युकेशन सोसायटी आयोजित केलेल्या आजी-माजी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सत्काराप्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
याप्रसंगी विचार मंचावर संस्थेचे अध्यक्ष विलासराव चौधरी, संचालक के. आर. चौधरी, किशोर कोल्हे, सुनील चौधरी, दिलीप महाजन, पंडित चौधरी, मुख्याध्यापक डॉ. मिलिंद बागुल, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका विद्या कोल्हे उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना ते पुढे म्हणाले की विद्यार्थ्यांनी जीवनामध्ये वेळेचे अधिकाधिक महत्त्व लक्षात घेत आपल्या कुटुंबाशी, आपल्या देशाशी बांधिलकी जोपासत प्रगतीच्या शिखरावर जाण्याकरता प्रयत्नांची पराकाष्टा करत असताना शिक्षकांप्रती आपल्या मनामध्ये, जीवनामध्ये कृतज्ञता अत्यंत महत्त्वाची असल्याचे देखील विजय माहेश्वरी यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. परिचय मीनाक्षी कोल्हे यांनी तर प्रास्ताविक संतोष कचरे यांनी केले. विविध अशा कार्यक्रमाचे संचलन भावना चौधरी शुभांगीनी महाजन, वृषाली चौधरी, सचिन जंगले यांनी केले. आभार किरण तायडे यांनी मानले. याप्रसंगी विद्यालयातील विद्यार्थिनी प्रज्ञा कापडणे, हेमांगी पाटील, ओम कोळी, अर्शिया पिंजारी यांच्या हस्ते प्रमुख मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
शिक्षकांतर्फे नितीन वाणी, अनिता पाटील यांनी मनोगत व्यक्त केली. प्रज्ञा कापडणे यांनी आपल्या शिक्षकाप्रती मनोगतातून कृतज्ञता व्यक्त केली. विद्यालयातील विद्यार्थिनी चरणीका चौधरी, समीक्षा चौधरी, अबोली काळे, चैताली पाटील, सृष्टी डोळसे, आरोही पाटील या विद्यार्थिनींनी कुलगुरू महोदयांचे आदरपूर्वक स्वागत केले. संस्थेतील सर्व विभागातील आजी-माजी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या कार्यक्रमास उपस्थित होते.