नाशिक : मार्च महिना संपत आला असतांना उन्हाच्या झळा देखील हळूहळू वाढू लागल्या आहेत. याचा परिणाम राज्यातील धरणांसह अन्य पाणी साठ्यांवर जाणवू लागला आहे. राज्यातील धरणांमध्ये जेमतेम ४० टक्के पाणीसाठा शिल्लक असून पाणीसाठा कमी झाल्याने राज्यभरात टँकरची मागणी वाढली आहे. नाशिक विभागात १०० गाव-पाड्यांमध्ये २७१ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. आतापासूनच इतकी वाईट परिस्थिती असल्याने एप्रिल व मे महिन्यात नेमकी कशी परिस्थिती असेल? याचे टेंन्शन सर्वांनाच आले आहे.
गेल्यावर्षी राज्यात समाधानकारक पाऊस झालाच नाही. परतीच्या पावसानेही दमदार हजेरी लावली नाही. परिणामी अनेक धरणे १०० टक्के भरलीच नाही. याचा परिणाम आता मार्च महिना संपत आला असतांना जाणवू लागला आहे. आधीच कमी भरलेल्या धरणांची पातळी दिवसेंदिवस कमी होवू लागली आहे. एकीकडे उन्हाचा तडाखा जाणवू लागला पाणीटंचाईचे चटके देखील बसू लागले आहेत. परिणामी आतापासूनच ३ हजार गावांत सुमारे ९४० टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
सध्या राज्यभरातील लहान मोठ्या अशा दोन हजार ९९४ धरणांमध्ये केवळ ४० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी याच दिवशी हा साठा ५५.८५ टक्के होता. सर्वांत गंभीर स्थिती मराठवाड्यात असून येथील धरणांमध्ये केवळ २० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. पुणे विभागातील धरणांमध्ये केवळ ४२.१२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. नाशिक विभागात फक्त ४०.३८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
ग्रामीण भागात टँकरच्या मागणीत वाढ होत आहे. गेल्या आठवड्यातील आकडेवारीनुसार ८६० गावे आणि २०५४ वाड्यांमध्ये ९४० टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. यामध्ये मराठवाड्यात सर्वाधिक ३०० गावे वाड्यांना ३८१ टँकरने, नाशिक विभागात १०० गाव-पाड्यांमध्ये २७१ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.