यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांच्या ११२ शिक्षणक्रमांची परीक्षा २७ मे ते १७ जूनदरम्यान होणार आहे. २०२४-२०२५ या शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशित नियमित विद्यार्थ्यांची सत्र तथा वार्षिक परीक्षा व जानेवारी २०२५ च्या सत्र परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या पुनर्परीक्षार्थीचीही लेखी परीक्षा राज्यभरातील ५८० परीक्षा केंद्रांत होईल. त्यासाठी सुमारे चार लाख २५ हजार २०८ विद्यार्थी प्रविष्ट होणार आहेत. दरम्यान, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमुळे विद्यापीठाची १ जूनची पूर्वघोषित परीक्षा रद्द करून ती पुढे नियोजित करण्यात आली आहे.
विद्यापीठात शिक्षण घेणारे विद्यार्थी नोकरदार, व्यावसायिक, पोलीस, सैनिक, गृहिणी, शिक्षक, कामगार आदी समाजातील विविध घटकांतील आहेत. विशेष म्हणजे त्यात १२१ ज्येष्ठ नागरिक व राज्यातील विविध तुरुंगातील तीन हजार १६ कैद्यांचा समावेश आहे. त्यांच्याद्वारे या परीक्षेत विविध विषय मिळून २७ लाख २८ हजार ४०२ उत्तरपत्रिका लिहित्या जाणार आहेत.
परीक्षा सुरळीत होण्यासाठी विद्यापीठामार्फत विविध भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. परीक्षा आयोजनाच्या सर्व मार्गदर्शक सूचना विभागीय केंद्रांमार्फत परीक्षा केंद्रांना देण्यात आल्या असून, मदत यंत्रणाही कार्यरत केली आहे. १ जून रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची वर्ग ‘क’ ची परीक्षा असत्याने मुक्त विद्यापीठाद्वारे यापूर्वी घोषित १ जूनची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. त्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे.
संबंधित विद्यार्थ्यांनी ते संकेतस्थळावरून डाउनलोड करून घ्यावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. आयोगाची वर्ग ‘क’ची परीक्षा असल्याने मुक्त विद्यापीठाद्वारे यापूर्वी घोषित १ जूनची परीक्षा पुढे ढकलण्यात येऊन सुधारित तारखांबाबत संबंधित परीक्षा केंद्रांना व विद्यार्थ्यांना कळविण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्रावर परिपत्रकानुसार सुधारित तारखेची नोंद करून प्रवेशपत्र उपलब्ध केले जाईल.
प्रवेशपत्रावर नमूद तारीख आणि वेळेनुसारच द्यावयाची आहे. ycmou.digitalunivers ity.ac या संकेतस्थळाला भेट द्यावी. मुक्त विद्यापीठाच्या या संकेतस्थळावरील ‘एक्झामिनेशन’ या शीर्षकाखाली मे २०२५ परीक्षेची संपूर्ण माहिती उपलब्ध करण्यात आली आहे. या संकेतस्थळाला विद्यार्थ्यांनी अद्ययावत माहितीसाठी वेळोवेळी भेट देण्याचे आवाहन विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आले आहे.