Raj Thackeray On Operation Sindoor: पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पीओकेमधील 9 दहशतवादी प्रशिक्षण तळ उद्ध्वस्त केले. भारताच्या या कारवाईत १०० हून अधिक दहशतवादी मारले गेल्याचे वृत्त आहे. दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठीच भारतीय लष्कराकडून हे ‘ऑपरेशन सिंदूर‘ राबवण्यात आले. दरम्यान या बाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले राज ठाकरे ?
मनसे प्रमुख राज ठाकरे म्हणाले, “पहलगाममधील हल्ल्यानंतर मी पहिली पोस्ट केली होती. पाकिस्तानला धडा शिकवणे आवश्यक होते. त्या अतिरेक्यांच्या पुढच्या पिढ्यांना लक्षात राहिलं असा धडा शिकवला पाहिजे. दहशतवादी हल्ल्याला युद्ध हे उत्तर नाही. पाकिस्तान आधीच उद्ध्वस्त झालेला देश आहे. आतापर्यंत हल्ला करणाऱ्यांना आपण शोधू शकलो नाही. त्यांना शोधणे ही आपली पहिली जबाबदारी आहे. अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली आहे.
तसेच अमेरिकेत दहशतवादी हल्ला झाला म्हणून त्यांनी युद्ध केलं नाही. त्यांनी अतिरेकी ठार मारले, दुसऱ्यादेशामध्ये युद्ध परिस्थिती आणायचीय. आता मॉक ड्रील करायचं, सायरन वाजवायचे. मूळात ही गोष्ट का घडली? याचा अंतमूर्ख होऊन आपण विचार करणं गरजेच आहे. असं मनसे प्रमुख राज ठाकरे म्हणाले.
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानात खळबळ
पाकिस्तानात बसलेल्या दहशतवादी सूत्रधारांविरुद्ध भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू केले. याअंतर्गत पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले. भारताच्या या कृतीमुळे संपूर्ण पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली आहे. भारताच्या कृतींमुळे पाकिस्तान निराश झाला आहे आणि नियंत्रण रेषेवर सतत युद्धबंदीचे उल्लंघन करत आहे.