Operation Sindoor: आज पहाटे भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला केला. भारताची ही कारवाई गेल्या महिन्यात पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून करण्यात आला. भारताच्या या कारवाईत १०० हून अधिक दहशतवादी मारले गेल्याचे वृत्त आहे. दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठीच भारतीय लष्कराकडून ‘ऑपरेशन सिंदूर‘ राबवण्यात आल्याचे भारतीय लष्कराच्या संयुक्त पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी आज (दि.७) रोजी पत्रकार परिषद घेतली. पाकिस्तानने आतापर्यंत भारतावर केलेल्या हल्ल्यांचा व्हिडिओ दाखवून पत्रकार परिषदेला सुरूवात करण्यात आली. पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले विक्रम मिस्त्री, मुंबईमधील २६/११ हल्लानंतर पहलगाममधील हा सर्वात मोठा हल्ला होता. यामध्ये २६ भारतीय आणि १ नेपाळमधील एक नागरिक मारले गेले. लष्कर ए तोयबाच्या TRF दहशतवादी संघटनेनेच हा भ्याड हल्ला केल्याचे मिस्त्री यांनी स्पष्ट केले. यावेळी परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ची सर्व माहिती दिली.
काय आहे ‘ऑपरेशन सिंदूर’?
‘ऑपरेशन सिंदूर’ हे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला दिलेले प्रत्युत्तर आहे. त्याचे नाव प्रतिकात्मकदृष्ट्या खोलवर आहे. भारतीय संस्कृतीत सिंदूर हे वैवाहिक आनंदाचे आणि विवाहित महिलांच्या सन्मानाचे प्रतीक आहे.
पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी ज्या क्रूरतेने निष्पापांना लक्ष्य केले त्यात महिला आणि मुलांसह नागरिकांचा समावेश होता. म्हणूनच त्याला ‘ऑपरेशन सिंदूर’ असे नाव देण्यात आले. हे केवळ लष्करी प्रत्युत्तरच नाही तर ते नारी शक्तीच्या सन्मान आणि सुरक्षेसाठी भारताच्या अटल वचनबद्धतेचे देखील प्रतीक आहे.
हा दहशतवाद्यांना एक इतका मजबूत संदेश आहे की भारत आपल्या भूमीचे आणि आपल्या नागरिकांचे रक्षण करण्यासाठी शक्य ते सर्व पाऊल उचलण्यास तयार आहे.
‘ऑपरेशन सिंदूर’ का राबवण्यात आले?
भारतीय संरक्षण मंत्रालयाने स्पष्टपणे सांगितले आहे की ‘ऑपरेशन सिंदूर’ चा थेट उद्देश पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी तळांना नष्ट करणे होता. दहशतवाद्यांच्या याच ठिकाणांवरून भारतात हल्ला करण्याचे कट रचले गेले होते. ही कारवाई फक्त दहशतवाद्यांवर होती, त्यात पाकिस्तानी सैन्याला लक्ष्य केले गेले नव्हते.
‘ऑपरेशन सिंदूर’ चा उद्देश
भारतीय हवाई दलाने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील ९ दहशतवादी तळांवर हल्ला केला. या ठिकणी लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मद सारख्या दहशतवादी संघटनांचे दहशतवादी हल्ल्यासाठी प्रशिक्षण दिले जात होते. या या ठिकाणांमध्ये कोटली, बहावलपूर, मुझफ्फराबाद आणि पंजाब प्रांतातील काही भागांचा समावेश होता.
‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर ची प्रतिक्रिया
हा हल्ला भारतीय लष्कराने ७ मे २०२५ रोजी रात्री १:३० वाजता केला. यामध्ये, हवाई दलाने अतिशय अचूक क्षेपणास्त्रांचा वापर केला. वृत्तानुसार, या कारवाईत २४ क्षेपणास्त्रे डागण्यात आली आणि लष्कर-ए-तोयबाच्या एका मोठ्या कमांडरलाही लक्ष्य करण्यात आले. ‘ऑपरेशन सिंदूर’चा उद्देश पाकिस्तानी सैन्यावर हल्ला करणे नव्हता. भारत सरकारने स्पष्ट केले आहे की ही केवळ दहशतवादाविरुद्धची कारवाई आहे.
भारताच्या या हवाई हल्ल्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सोशल मीडियावर ‘भारत माता की जय’ लिहिले. याशिवाय, भारतीय सैन्यानेही ऑपरेशननंतर सोशल मीडियावर ‘न्याय हो गया’ असे लिहून आपली प्रतिक्रिया दिली.