PM Modi : विरोधी आघाडीच्या इंडिया नावावर मोदींचा हल्लाबोल, वाचा काय म्हणाले आहे?

नवी दिल्ली: ‘ईस्ट इंडिया कंपनी’, ‘पीएफआय’ आणि ‘इंडियन मुजाहिदीन’ यांच्या नावामध्येही ‘इंडिया’ हा शब्द आहे. त्यामुळे विरोधी पक्षांनी नाव बदलले तरीही जनतेची दिशाभूल करता येणार नाही, असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी आघाडीवर केला आहे.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या संसदीय पक्षाच्या बैठकीस संबोधित केले. यावेळी त्यांनी विरोधी पक्षांच्या नव्या आघाडीचाही समाचार घेतला.

ते म्हणाले, केवळ देशाचे नाव घेऊन जनतेची दिशाभूल करता येणार नाही. ‘ईस्ट इंडिया कंपनी’, ‘पीएफआय’ आणि ‘इंडियन मुजाहिदीन’ यांच्या नावामध्येही ‘इंडिया’ हा शब्द वापरण्यात आला आहे. त्यामुळे केवळ नाव बदलून खरे मनसुबे लपवून देशातील जनतेची दिशाभूल करणे कोणत्याही राजकीय पक्षास शक्य नाही, असे पंतप्रधानांनी म्हटले.

विरोधी पक्ष हताश आणि निराश झाल्याचा टोला पंतप्रधानांनी लगाविला. ते पुढे म्हणाले, विरोधी पक्षांची सध्याची स्थिती पाहता त्यांना कायमच विरोधी पक्षात बसायचे असल्याचे जाणवते. सत्तेत येण्याचा विचारही ते करू शकत नसल्याचे दिसते. त्यामुळे ते अतिशय विस्कळीतपणे काम करत असून अशाप्रकारचे अतिशय दिशाहीन आणि कमकुवत विरोधी पक्ष आपण प्रथमच बघत असल्याचेही पंतप्रधानांनी यावेळी सांगितले.

जगभरात भारताची प्रतिमा अतिशय मजबूत झाल्याचा पुनरुच्चार पंतप्रधानांनी यावेळी केला. स्वातंत्र्याचा अमृतकाल संपेपर्यंत म्हणजेच २०४७ पर्यंत आपण देशाला विकसित देश बनवू. देशवासीयांना आपल्याकडून खूप आशा आहेत. आगामी काळात विरोधकांमध्ये आणखी फूट पडणे निश्चित आहे. जनतेच्या पाठिंब्याने भाजप २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतही सत्तेवर येईल, असा विश्वास असल्याचे पंतप्रधान म्हणाले.