जळगाव : जिल्ह्यात गत सप्ताहात बेमोसमी पावसाने थैमान घातले होते. यात सुमारे सहा हजाराहून अधिक हेक्टरवरील शेतपिकांना फटका बसला होता. याचे पंचनामे होत नाहीत तोच, १३ ते१९ मेपर्यंत पुन्हा बेमोसमी पावसाचे संकेत असल्याचे हवामान विभागाने अंदाज वर्तविला आहे.
जिल्ह्यात मे महिन्याच्या सुरूवातीलाच तप्त उन्हाचा तडाखा असतानाच गत सप्ताहात बेमोसमी पावसाने हजेरी लावली होती. यात रब्बी हंगामातील केळी बागायती पिकांसह ज्वारी, बाजरी, मका आदी शेतपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या नुकसानीची पाहणी पालकमंत्री गुलाबराव पाटील, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, खासदार स्मिता वाघ, तसेच जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा कृषी अधीक्षक कुरबान तडवी आदी अधिकाऱ्यांनी पाहणी करीत पंचनामे करण्यात आले आहेत.
ही परिस्थिती निवळत नाही तोच…
ही परिस्थिती निवळत नाही तोच, १३ ते१९ मेपर्यंत पुन्हा बेमोसमी पावसाचे संकेत असल्याचे हवामान विभागाने अंदाज वर्तविला आहे. अर्थात वादळी पाऊस, विजांचा कडकडाट आणि गारपिटीचा इशारा दिला आहे. जळगावसह नाशिक, धुळे, नंदुरबार या चार जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.
तर मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, औरंगाबाद, परभणी, जालना, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.