जळगाव : राज्यातील विविध भागांमध्ये अवकाळी पावसाच्या हजेरीने लागल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. आता उरलसूरल पीकही वाया जाण्याची शक्यता आहे. कारण आज गुरुवारी हवामान खात्याने जळगावसह राज्यातील 13 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट म्हणजेच मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
जळगाव जिल्ह्यातील काही भागात देखील रात्री विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लागली आहे. जिल्ह्यात रब्बी पिकांची काढणी सुरु असून त्यात अवकाळी पाऊस थैमान घालत आहे. आज जळगाव जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, अवकाळी पावसामुळे तापमानाचा पारा घसरला आहे. यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.
आज या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
पुणे हवामान विभागाचे शास्त्रज्ञ के. एस. होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार आज राज्यातील जवळपास 13 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट म्हणजेच मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर, पुणे, अहमदनगर, नाशिक, जळगाव, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, नागपूर, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
या जिल्ह्यांत आज दिवसभरात मुसळधार पावसाची शक्यता असून गरज असेल तेव्हाच नागरिकांनी घराबाहेर पडावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.