Jayakumar Rawal : शेतकऱ्यांसाठी पणन सुविधा बळकट करा, पणन मंत्र्यांचे आदेश

#image_title

पुणे : कृषी उत्पन्न बाजार समित्यांना अधिक सक्षम करण्यासाठी पणन सुविधा बळकट करणे आवश्यक असून, येणाऱ्या काळात पणन मंडळाने शेतकऱ्यांच्या व्यापक हितासाठी यावर भर द्यावा, अशी सूचना पणन मंत्री जयकुमार रावल यांनी केली. तसेच शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी आणि कृषीमालाचे नुकसान रोखण्यासाठी आवश्यक सुविधा तातडीने उपलब्ध कराव्यात, असेही त्यांनी निर्देश दिले.

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ आणि महाराष्ट्र राज्य काजू मंडळाच्या संचालक मंडळाची बैठक पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत आमदार तथा काटोल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती चरणसिंह ठाकूर, सहकार आयुक्त दीपक तावरे, कृषी आयुक्त सूरज मांढरे, कृषी पणन संचालक विकास रसाळ, उपकृषी पणन सल्लागार भवेष कुमार जोशी, महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी महासंघाचे सभापती प्रवीण कुमार नाहटा, सिल्लोड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती केशवराव तायडे, तसेच महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम, सरव्यवस्थापक विनायक कोकरे, महाराष्ट्र राज्य काजू मंडळाचे संचालक डॉ. परशुराम पाटील, संचालक व काजू प्रक्रिया उद्योजक रुपेश बेलोसे आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रकल्पांच्या विकासाला गती

मंत्री रावल यांनी बापगाव, काळडोंगरी, जाधववाडी आणि तळेगाव दाभाडे येथील प्रकल्पांच्या विकासाला गती देण्याचे निर्देश दिले. कामे करताना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून गुणवत्तापूर्ण कामे पूर्ण करावीत. बापगाव आणि काळडोंगरी येथील संरक्षक भिंतीचे बांधकाम त्वरित पूर्ण करावे. बापगावला निर्यातक्षम हब म्हणून विकसित करून स्मार्ट योजना राबवावी. तसेच, तळेगाव दाभाडे येथे ‘आंतरराष्ट्रीय फुल बाजार’ निर्माण करण्याची प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

कृषी पणन मंडळाच्या योजनांना चालना

शेतकऱ्यांना अधिकाधिक लाभ मिळावा यासाठी कृषी पणन मंडळाच्या योजना प्रभावीपणे राबवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. काजू फळपीक विकास योजनेअंतर्गत 1 हजार मे. टन क्षमतेचे गोदाम उभारणी करण्याबाबतही मंत्री रावल यांनी निर्देश दिले. बाजार भावाच्या लिलावाबाबत शेतकऱ्यांना तत्काळ माहिती मिळावी म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मोठ्या आकाराच्या स्क्रीन बसवण्याचे निर्देश त्यांनी दिले.

ई-नाम प्रणालीत वाढ

राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांना ई-नाम प्रणालीशी जोडण्याचे काम वेगाने सुरू असून, यापूर्वी अनेक बाजार समित्या या प्रणालीशी जोडल्या गेल्या आहेत. आता नव्याने 16 कृषी उत्पन्न बाजार समित्या ई-नाम प्रणालीशी जोडल्या जाणार असून, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्या अधिक अद्ययावत करण्यावर भर दिला जाणार आहे.

बाजार समित्यांचे उत्पन्न वाढवण्यावर भर

बाजार समित्यांनी आपले उत्पन्न वाढवण्यासाठी उत्पन्नाचे विविध स्रोत विकसित करावेत, असे मंत्री रावल यांनी स्पष्ट केले. तसेच, कृषी पणन मंडळाच्या ताब्यातील जागेचा पुरेपूर उपयोग व्हावा आणि मंडळातील थकीत कर्ज वसुलीबाबत कार्यवाही करावी, असे निर्देशही त्यांनी दिले.

काजू उद्योगांना चालना देण्याचा प्रयत्न

राज्यातील काजू उद्योगाला अधिक चालना देण्यासाठी प्रभावी धोरण बनवले जाणार आहे. महाराष्ट्राचा काजू देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी उपलब्ध व्हावा यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. काजू प्रक्रिया उद्योग व्हिएतनामच्या धर्तीवर विकसित करण्यासाठी मंडळाने प्रस्ताव तयार करावा, तसेच अधिकाधिक उद्योजकांना प्रोत्साहनपर निधी देण्याबाबत विचार केला जाईल, असे मंत्री रावल यांनी सांगितले.