बांगलादेशी घुसखोरांवर कठोर कारवाई करा; केंद्रीय गृहमंत्रालयाचा राज्य प्रशासनाला आदेश

मुंबई : महाराष्ट्रात बांगलादेश आणि म्यानमारमधून अवैधरीत्या येणाऱ्या घुसखोरांविरोधात तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश केंद्रीय गृह मंत्रालयाने दिले आहेत. महाराष्ट्राचे मुख्य सचिव, पोलीस महासंचालक आणि इतर संबंधित यंत्रणांना यासंदर्भात निर्देश देण्यात आले आहेत. शिवसेना उपनेते आणि माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या मागणीची दखल घेत गृहमंत्री अमित शाह यांनी ही पावले उचलली आहेत.

काही दिवसांपूर्वी अभिनेता सैफ अली खानवर बांगलादेशी घुसखोरांनी हल्ला केल्याची घटना घडली होती. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयाच्या निर्णयाने अवैध घुसखोरांविरोधातील कारवाई वेग घेईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

28 नोव्हेंबर 2024 रोजी गृहमंत्री अमित शाह यांना लिहिलेल्या पत्रात राहुल शेवाळे यांनी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS) संस्थेकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणाचा उल्लेख केला. या सर्वेक्षणानुसार, मुंबईत बांगलादेशी आणि म्यानमारमधून आलेल्या घुसखोरांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला असून सामाजिक व आर्थिक समस्या निर्माण होत आहेत.

हेही वाचा : पतीला झोपेच्या गोळ्या देऊन ‘ती’ जायची परपुरुषासोबत; मुलीला जाग आली अन् महिलेचं कांड उघड

शेवाळे यांच्या मते, या घुसखोरांमुळे स्थानिक नागरिकांच्या रोजगारांवर मोठा परिणाम होत आहे. काही राजकीय पक्ष या घुसखोरांचे ‘वोट बँक’ म्हणून लांगूलचालन करत आहेत. त्यामुळे परिस्थिती आणखीनच बिघडत आहे.

हिंदू लोकसंख्येच्या घटतीवर चिंता

1961 च्या जनगणनेनुसार मुंबईतील हिंदू लोकसंख्या 88% होती, जी 2011 मध्ये 66% पर्यंत घसरली. राहुल शेवाळे यांच्या म्हणण्यानुसार, हीच टक्केवारी 2051 पर्यंत 54% पर्यंत घसरेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा : Sharon Raj murder case : विश्वास ठेवावा तर कुणावर ? प्रेयसीनेच केला घात, अखेर फाशीची शिक्षा

शेवाळे यांनी पत्रात काही नोंदणीकृत नसलेल्या अवैध सामाजिक संस्थांवरही कारवाईची मागणी केली आहे. अशा संस्थांकडून या घुसखोरांना रसद पुरवली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

केंद्राच्या आदेशाने कारवाईला वेग

केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आदेशांमुळे आता राज्यातील यंत्रणा अवैध घुसखोरांविरोधात जलदगतीने कारवाई करेल, अशी अपेक्षा आहे. कायदा-सुव्यवस्थेचे रक्षण करण्यासाठी या पावलाला महत्त्व आहे.