भुसावळ : जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने गोपनीय माहितीच्या आधारे महामार्गावरील एका आयशर वाहनातून पाच क्विंटल वजनाचा व 75 लाख रुपये किंमतीचा कोरडा गांजा जप्त केला होता. पोलिसांच्या कारवाईचा सुगावा लागल्याने संशयीत पसार झाले होते मात्र पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे चालकासह अन्य एका संशयीताच्या चांदवड येथून शुक्रवारी पहाटे मुसक्या बांधल्या आहेत. ओरीसातील भुवनेश्वर येथून या गांजाची मालेगावसह नाशिककडे तस्करी होणार असल्याची माहिती असून यात मोठे आंतरराष्ट्रीय रॅकेट सहभागी असल्याचा संशय आहे. या प्रकरणातील बडे मासे पकडण्यासाठी आरोपींची नावे पोलिसांनी जाहीर करण्यास असमर्थता दर्शवली.
गोपनीय माहितीवरून कारवाई
जळगाव गुन्हे शाखा व बाजारपेठ पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचत शुक्रवारी पहाटे ट्रामा केअर सेंटर पुढे असलेल्या पेट्रोल पंपाच्या अलिकडे आयशर गाडी (एम.एच.15 एच.एच.6994) जप्त केली होती. या वाहनात इलेक्ट्रीक साहित्याच्या आड गांजाची तस्करी होत असल्याचे स्पष्ट झाले होते. या वाहनातून 16 गोण्यांमधून 75 लाख नऊ हजार 900 रुपये किंमतीचा कोरडा गांजा जप्त करण्यात आला तर इलेक्ट्रीक सामानासह वाहन मिळून एकूण 93 लाख 13 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. भुसावळ शहर पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोघा आरोपींच्या चांदवडमध्ये आवळल्या मुसक्या
आयशर वाहनाच्या तपासणीदरत्यान त्यात मिळालेल्या डायरीत चालकाचा क्रमांक होता व त्याआधारे तांत्रिक विश्लेषणाअंती एलसीबीने चांदवड, ता.नाशिक येथून वाहन चालकासह अन्य एका संशयीताच्या शुक्रवारी पहाटे चांदवड येथून मुसक्या आवळल्या आहेत. आरोपींचे आणखी चार साथीदार असून त्यांनादेखील लवकरच अटक करू, असा विश्वास निरीक्षक किसनराव नजन-पाटील यांनी व्यक्त केला. मोठी आंतरराष्ट्रीय टोळी असल्याने तपासार्थ पोलिसांनी संशयीतांची नावे जाहीर केली नाहीत. तपास उपनिरीक्षक गणेश चोभे करीत आहेत.