पाकिस्तानातील शरीफ सरकारपुढील आव्हाने कमी होण्याऐवजी वाढतच चालली आहे. भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिन्दुरने पाकिस्तानची जगभर नाचक्की झाली. भारताने पाकिस्तानात घुसून पाकिस्तानला जो तडाखा दिला त्याने पाकिस्तानची जनता पाकिस्तानच्या शहाबाज शरीफ सरकारवर चिडून आहे. त्यात पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये स्वतंत्र बलुचिस्तानसाठी बलुचिस्तानी नागरिकांनी सरकारविरोधात एल्गार पुकारून सरकारला आवाहन दिले आहे.
बलुच लिबरेशन आर्मीने पाकिस्तानी लष्कराविरुद्ध लढा पुकारून स्वतंत्र बलुचिस्तानची घोषणा देखील केली. सीमेवर भारतीय लष्कराशी आणि सीमेच्या आत बलुचिस्तान लीबरेशन आर्मीशी लढताना पाकिस्तान अक्षरशः भिकेकंगाल झाला आहे. पाकिस्तानची अर्थव्यवस्था रसातळाला गेल्याने पाकिस्तान जगात भिकेचा कटोरा घेऊन फिरत आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाकिस्तानला निधी दिला असला तरी त्यासाठी अनेक अटी घातल्या आहेत. पाकिस्तानात महागाई इतकी वाढली आहे की पाकिस्तानी नागरिकांना एकवेळचे जेवण मिळणे देखील मुश्किल झाले आहे.
महागाईने जनता मेटाकुटीला आली आहे. त्यात भारताने सिंधू जल करार स्थगित केल्याने पाकिस्तानी नागरिकांवर पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ आली आहे. जर भारताने हा जल करार पूर्ववत केला नाही तर भविष्यात पाकिस्तानात मोठी पाणीबाणी निर्माण होऊ शकते यावर तोडगा म्हणून पाकिस्तानच्या शरीफ सरकारने ग्रीन पाकिस्तान इनिशीएटीव्ह हा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला. सुमारे साडेतीन हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प चीनच्या मदतीने पकिस्तान साकारनार आहे.
या प्रकल्पास पाकिस्तानची दुसरी हरित क्रांती संबोधली जातेय. या प्रकल्पाअंतर्गत पाकिस्तानातील चेलिस्तान वाळवंटातील सुमारे ४८ लाख एकर जमीन सिंचनाखाली येणार आहे. त्यासाठी शेकडो किलोमिटरची सहा कालवे काढण्यात येणार आहे. या प्रकल्पाकडे पाकिस्तान सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून पाहण्यात येत आहे मात्र हाच प्रकल्प आता पाकिस्तानसाठी डोकेदुखी बनला आहे कारण या प्रकल्पाने सिंध प्रांतात येणारे पाणी पंजाब प्रांतात वळवले जाईल असे सिंध प्रांतातील नागरिकांना वाटते.
आपल्या हक्काचे पाणी पंजाब प्रांताला मिळणार असल्याने सिंध प्रांतातील नागरिक प्रचंड अस्वस्थ आहेत या अस्वस्थतेतूनच तेथील नागरिक रस्त्यावर उतरून पाकिस्तान सरकारविरुद्ध आंदोलन करत आहेत. भारत आणि बलुचिस्तान आर्मी पुढे हतबल झालेल्या शरीफ सरकारपुढे ही नवी डोकेदुखी उभी ठाकली आहे. पाकिस्तानातील सिंध प्रांतातील लोक आता सरकारच्या विरोधात रस्त्यांवर उतरून आंदोलने करीत आहेत. या आंदोलनाला हिंसक वळण देखील लागले आहे. संतप्त आंदोलकांनी सिंध प्रांतातील गृहमंत्र्यांच्या घराला आग लावली. यावेळी झालेल्या गोळीबारात तीन नागरिकांचा मृत्यू झाला. हे आंदोलन वाढतच चालले आहे.
पाकिस्तान लष्कर आणि सरकारमध्ये पंजाबचे वर्चस्व असून त्यांचे सिंधच्या विकासाकडे वर्षानुवर्ष दुर्लक्ष होत असल्याची तेथील नागरिकांची तक्रार आहे. पाकिस्तान सरकार सिंध प्रांतावर कायम अन्याय करीत असल्याची भावना तेथील नागरिकांची झाली आहे. या अन्यायाविरोधात सिंध प्रांतातील नागरिक आवाज उठवत आहेत. इतकेच नाही तर या आंदोलनात सिंध प्रांतातील नागरिकांनी स्वतंत्र सिंधू देशाची मागणी केली आहे. ही मागील आताच नव्हे तर मागील काही वर्षांपासून करण्यात येत आहे.
पाकिस्तानातील सिंध प्रांतात हिंदू धर्मीय नागरिक मोठया प्रमाणात राहतात. या नागरिकांवर गेल्या काही वर्षांपासून अन्यायाची मालिका सुरू असून ही अन्यायाची मालिका संपावी आणि सिंध प्रांतातील हिंदू नागरिकांना त्यांचे अधिकार आणि हक्क प्राप्त व्हावेत यासाठी जगभरातून या आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे. मागील काही काळात पाकिस्तानातील हिंदू महिलांवर विशेषतः सिंधी हिंदू महिलांवरील अत्याचाराच्या घटनांत कमालीची वाढ झाली आहे.
या भागातील मुलींचे, महिलांचे फसवून, पळवून, सक्तीने धर्मांतर केले जात आहे. वाढत्या अत्याचारामुळे येथील नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. वारंवार सरकारला विनंती करूनही सरकार त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने तेथील नागरिक अस्वस्थ होते त्यातच या नव्या प्रकल्पाची भर पडल्याने तेथील नागरिकांची अस्वस्थता आणखी वाढली. आपल्यावर होणारा अन्याय दूर करायचा असेल तर स्वतंत्र सिंधू देशाशिवाय पर्याय नाही अशीच भावना तेथील नागरिकांची झाली आहे त्यातूनच स्वतंत्र सिंधू देशाची मागणी करण्यात आली. मागील वर्षीच स्वतंत्र सिंधू देशाला भारत आणि अमेरिकेने पाठिंबा द्यावा अशी विनंती करण्यात आली होती. त्यावर दोन्ही देशांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नसली तरी भविष्यात या दोन्ही देशांना आंदोलनकर्त्यांच्या या मागणीची दखल घ्यावीच लागेल आणि जेंव्हा हे दोन्ही देश या मागणीची दखल घेतील तेंव्हा पाकिस्तानची आणखी शकले झालेली असतील.
श्याम ठाणेदार – ९९२२५४६२९५