संतापजनक! गुंगीचे औषध पाजून तरुणी.. खोलीत डांबून ठेवले

तरुण भारत लाईव्ह न्यूज । ९ डिसेंबर २०२२ । शहरातील २० वर्षीय तरुणीला लग्न करण्यासाठी गुंगीचे औषध देवून तीचे अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तरुणीला अहमदनगर येथे नेवून तीला एका खोलीत देखील डांबून ठेवण्यात आल्याचे समोर आले. याप्रकरणी १२ जणांविरुद्ध रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरताल पिंप्राळा येथे २०वर्षीय तरूणी ही कुटूंबियांसह वास्तव्यास आहे. काही महिन्यांपूर्वी तरूणीला लग्नासाठी अहमदनगर येथील स्थळ आले होते. परंतु मुलगा नात्याने तरुणीचा मामा लागत असल्याने तिच्या कुटुंबियांनी ते स्थळ नाकारले होते. त्यानंतर नागपूर येथील एका मुलासोबत तरुणीचा साखरपूडा झाल्याने त्यांच्या लग्नाची तयार सुरु होती. दि. 8 जून रोजी सकाळी 5.15 वाजता तरूणी श्रीराम मंदिर संस्थानच्या मैदानावर मॉर्निंक वॉक करण्यासाठी आली असता, याठिकाणी ईश्वर राणा, पल्लवी राणा, सुरज किलोलिया हे एका कारमधून तेथे आले.

आम्ही तुमच्या घरी जात आहोत, तु गाडीत बस असे त्यांनी तरुणीला सांगितले. तिघे ओळखीचे असल्यामुळे तरूणी त्यांच्या कारमध्ये बसली. परंतु कार तरुणीच्या घराकडे न जाता ती अजिंठा चौफुलीकडे निघाली. याचवेळी तरुणीला तिघांनी गुंगीचे औषध पाजल्यामुळे तरुणी बेशुद्ध पडली. ज्यावेळी तरुणीला शुद्ध आली त्यावेळी तरुणीला तिघांनी मारहाण करुन तिला बुरखा घालण्यास भाग पाडले. त्यानंतर कारही सरळ अहमदनगर येथील न्यायालयात नेण्यात आली. तेथे सागर राणा व शिवम राणा उपस्थित होते. त्यांनी एका कागदावर तरूणीची बळजबरीने सही घेतली.

न्यायालयात कागदावर सही घेतल्यानंतर तरुणीला अहमदनगर येथील प्यारे भैय्या (पूर्ण नाव माहित नाही) याच्या घरातील एका खोलीत तरूणीला डांबून ठेवले होते. दुसर्‍या दिवशी सागर राणा याने तरुणीला सांगितले की, नागपूर येथील मुलगा मला पसंत नसून कुटुबिय ईच्छेविरुद्ध लग्न लावित असल्याचे पोलिसांना सांग असे त्याने सांगितले. नाही तर तुझ्या आई-वडीलांना व भावाला जीवेठार मारण्याची धमकी देखील त्याने दिली. त्याच दिवशी तरूणीचा शोध घेत तिचे वडील व रामानंदनगर पोलिस अहमदनगर तोफखाना पोलिस ठाण्यात पोहोचले. तेथून तिला पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

या संपूर्ण प्रकारामुळे समाजात बदनामी झाली आणि जुळलेले लग्न मोडले गेल्याने बुधवारी तरूणीने रामानंदनगर पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार सागर राणा, गोपाल राणा, गायत्री राणा, शिवम राणा, संगिता राणा, सुभाष राणा, प्यारे भैय्या (रा. अहमदनगर), पल्लवी राणा (रा.पुणे), सुरज किलोलिया (रा.जळगाव) तसेच एक कार चालक यांच्याविरूध्द रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.