संतापजनक! विधवा महिलेवर अत्याचार; शेतात काम करताना नराधमानं.., आरोपीला अटक

औरंगाबाद : पैठण तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शेतात काम करणाऱ्या विधवा महिलेवर एका नराधमाने अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

रशीद हुसेनखा पठान (वय ५५, रा. शिवनाई, बिडकीन, ता.पैठण, जि. औरंगाबाद) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

सूत्रानुसार, पीडित महिलेच्या पतीचं तीन महिन्यांपूर्वी निधन झालं आहे. आरोपी रशीद हुसेनखा पठान आणि पीडिता एकाच गावातील असल्याने दोघेही एकमेकांच्या ओळखीचे होते. आरोपीची पीडितेवर वाईट नजर होती. शुक्रवारी संध्याकाळी पीडिता कपाशीच्या शेतात एकटी काम करत होती. दरम्यान, शेतात पीडित महिलेला एकटे काम करत असल्याचं बघून आरोपीने संधी साधून पीडित महिलेचे तोंड दाबून धमकी देत महिलेसोबत बळजबरीने अत्याचार केला.

याबाबत कुणास सांगितल्यास वाईट होईल, अशी धमकी अत्याचारानंतर आरोपी पठानने महिलेला दिली. महिलेने घडलेला प्रकार नातेवाईकांना सांगितला त्यानंतर पीडितेने बिडकन पोलीस ठाणे गाठत आरोपी पठान विरोधात शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानुसार पोलिसांनी आरोपी पठाणला अटक केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोरे हे करत आहेत.